विनाऔषध उपचारपद्धती लाभदायी – प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


“पारंपरिक उपचार पद्धतीकडे आपण अधिक लक्ष दिले आणि त्यानुसार जीवनपद्धती अंगीकारली तर आजारांपासून आणि विविध व्याधींपासून आपण दूर राहू शकतो”, असे प्रतिपादन प्रा. गिरीधारीलाल लुथ्रिया यांनी केले.

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘दी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब’ यांच्या सौजन्याने मंत्रालयातील परिषद सभागृह येथे प्रा. लुथ्रिया यांचे ‘आर्ट ॲण्ड सायन्स ऑफ सेल्फ हिलिंग’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाज काझी, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हांजे, शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव श्री. राजपूत यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रा. लुथ्रिया म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या वेळापत्रकात आपले तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातून उद्भवलेल्या आजारांतून बरे होण्यासाठी वेगवेगळ्या पॅथींच्या औषधांचा मारा शरीरावर केला जातो. मात्र, नैसर्गिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींचा अवलंब केला तर व्यक्ती सुदृढ राहू शकते. त्यासाठी प्रत्येकाने त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी दक्षिण कोरियन ‘सु जोक’ या नैसर्गिक उपचार पद्धतीबाबत उपस्थितांना सोदाहरण माहिती दिली. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा आजारांवर हातांच्या बोटांवर विविध पद्धतीने क्रिया करुन या आजारांची तीव्रता कमी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहसचिव श्री. काझी यांनी प्रो. लुथ्रिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. तर, श्री. राजपूत यांनी प्रास्ताविक केले.


Back to top button
Don`t copy text!