फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात “नो व्हेईकल डे” साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 14 जानेवारी 2024 | फलटण | येथील मुधोजी महाविद्यालय काल शनिवार दि. 13 जानेवारी रोजी नो व्हेईकल डे पाळण्यात आला होता. प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आज काही पायी चालत तर काही सायकलवर, इलेक्ट्रिक गाडीवर किंवा सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांचा वापर करून महाविद्यालयात पोहोचले.

दर महिन्याचा दुसरा शनिवार हा महाविद्यालयात नो व्हेईकल डे म्हणून पाळण्यात येतो. पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषय  विद्यार्थी व पालकांच्यामध्ये जनजागृती व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून इंधनावर चालणाऱ्या वाहनांना महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही; याची सूचना आधीच देण्यात आली होती. तसेच महाविद्यालयाच्या आवारात कोणत्याही गाडीचा प्रवेश होऊ नये म्हणून एन.सी.सी. कॅडेट्सच्या मदतीने कॅप्टन संतोष धुमाळ, कॅप्टन लीना शिंदे, केअरटेकर सुजाता ननावरे, फिजिकल डायरेक्टर डॉ. स्वप्नील पाटील, महाविद्यालय परिसर विकास समिती सदस्य डॉ. नवनाथ रासकर, पर्यावरण शिक्षक प्रा. रणधीर मोरे यांनी विद्यार्थी व पालकांना गाडी महाविद्यालयात न आणण्याचे आवाहन केले.

यावेळी पर्यावरणप्रेमी प्रा. रणधीर मोरे यांनी बोलताना सांगितले की गाड्या मधील इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखा विषारी वायू गाड्यांच्या धुरांड्यामधून बाहेर पडून त्याची बाष्पाबरोबर प्रक्रिया होऊन नायट्रिक ऍसिड तयार होते. त्यामुळे डोळ्यांची जळजळ,  फुफूसांचे,  यकृताचे, किडनीचे आजार होतात. रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे यासारखे आजार उद्भवतात. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून व गाडयांचा अनावश्यक वापर टाळून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम,  उपप्राचार्य वरिष्ठ विभाग डॉ.संजय दीक्षित, कनिष्ठ विभाग उपप्राचार्य प्रा. संजय  वेदपाठक,  महाविद्यालय परिसर विकास समिती सदस्य यांनी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयाने हा उपक्रम सुरू केल्याबद्दल पर्यावरणप्रेमीं कडून समाधान व्यक्त केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!