“पोलीस खात्यावर विश्वास नाही, न्यायमूर्तींची समिती नेमा!” डॉ. संपदा मुंडे प्रकरणी सुषमा अंधारेंचा फलटण पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या


स्थैर्य, फलटण : डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे (SIT) सोपवण्यात आला असला तरी, “आमचा पोलीस खात्यावरच विश्वास नाही,” अशी उद्विग्न भूमिका घेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पीडितेच्या कुटुंबीयांसोबत फलटण शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती मान्य नसून, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.

आज डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांसोबत सुषमा अंधारे या पोलीस अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखले. यामुळे संतप्त झालेल्या अंधारे यांनी थेट पोलीस ठाण्याच्या दारातच बसून ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी केली.

“तपास सुरू असताना बदनामी का करता?”

यावेळी सुषमा अंधारे यांनी मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “एकीकडे तपास सुरू असल्याचे सांगितले जाते, दुसरीकडे जयकुमार गोरे आणि रूपाली चाकणकर हेच तपासावर बोलून पीडितेची बदनामी का करत आहेत? जयकुमार गोरे यांनी आधी स्वतःचे चारित्र्य तपासावे आणि मगच दुसऱ्याच्या लेकीवर शिंतोडे उडवावेत.”

गोरे आणि चाकणकर यांच्या वक्तव्यांचा समाचार

मंत्री जयकुमार गोरे यांनी या प्रकरणात एक ‘भयानक ट्रँगल’ असून, वास्तव वेगळे आहे, असे वक्तव्य केले होते. तर, रूपाली चाकणकर यांनी पीडिता लक्ष्मीपूजनासाठी आरोपी प्रशांत बनकरच्या घरी गेल्याचे आणि तिथे फोटो काढण्यावरून वाद झाल्याचे चॅटमधील तपशील उघड केले होते. यावर आक्षेप घेत अंधारे म्हणाल्या, “तपासातील गोपनीय पुरावे जयकुमार गोरे आणि चाकणकर यांना कोण पुरवत आहे? हे दोघे तपास अधिकारी आहेत का? तपास सुरू असतानाच पीडितेचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न आहे.”

“पोलीस डिपार्टमेंट नको, उच्च न्यायालयाची समिती हवी”

अंधारे यांनी तपासावर अविश्वास व्यक्त करताना स्पष्ट केले की, “डॉ. संपदाने चार पानी पत्रात मृत्यूची कारणे लिहिली आहेत. यात फक्त बनकर आणि बदनेच नव्हे, तर डीवायएसपी यांच्यासह विविध पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही?”

“या प्रकरणाचा तपास एसआयटी प्रमुख म्हणून तेजस्वी सातपुते यांच्याकडे दिला असला, तरी आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी नको आहे. आमचा तुमच्या डिपार्टमेंटवरच विश्वास नाही. आम्हाला या तपासासाठी उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती हवी आहे,” अशी ठाम मागणी त्यांनी केली.

“मंत्रालय जाम करू!”

“आम्ही बीडची माणसे आहोत. जर आम्ही न्यायासाठी इथपर्यंत (फलटण) येऊ शकतो, तर मुंबईचे मंत्रालयही जाम करू शकतो,” असा थेट इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी सरकारला दिला.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनीही संपदाच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटवर आणि शवविच्छेदन अहवालावर शंका व्यक्त केल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली असली, तरी अंधारे यांच्या या आंदोलनामुळे प्रकरणाला नवे वळण लागले आहे.


Back to top button
Don`t copy text!