
दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२४ | वाल्हे |
संतश्रेेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पंढरपूर ते आळंदी असा परतीचा प्रवास आज नीरा स्नानाला पोहोचला. माऊलींचे नीरा स्नान अगदी व्यवस्थितपणे पार पडले. परंपरेनुसार नीरा स्नान झाल्यानंतर विणेकर्यांना पादुकांचे दर्शन दिले जाते. सर्वप्रथम रथाच्या पुढील विणेकर्यांना आणि नंतर रथाला वेढा मारून मागील विणेकर्यांना दर्शन प्राप्त होते. यामध्ये थोडा विलंब झाला आणि काही अपोशक आणि वारकर्यांचे स्वघोषित नेतृत्व करणारे नेते यांनी या विलंबाचा फायदा घेत परंपरा मोडीत काढण्याचा सूर ओरडणे सुरू केले; परंतु सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झाली नाही, असा स्पष्ट खुलासा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी केला आहे.
योगी निरंजननाथ म्हणाले, माऊलींच्या परतीच्या सोहळ्यामध्ये सर्व दिंड्यांचे प्रतिनिधी म्हणून विणेकरी पायी चालतात आणि यावेळी सर्व परंपरा परिपूर्णपणे माहीत असतात. आजकाल वारीमध्ये काही वारकर्यांचे नेतृत्व करणारे स्वघोषित वारकरी महाराज हे सुद्धा घुसखोरी करताना दिसतात आणि त्यांच्याच करवी हे वाद निर्माण करून परंपरादिष्टित वारकर्यांना यामुळे त्रास होतो. इसवी सन १८३२ पासून श्री गुरू हैबतराव बाबा महाराज यांनी या पालखी सोहळ्याला विशिष्ट अशी परंपरा घालून दिलेली आहे. त्यामध्ये आजतागायत कुठलाही बदल कोणीही केलेला नाही. त्यामुळे नीरा स्नानानंतर कुठलीही परंपरा खंडित झालेली नाही. असा प्रसंग भविष्यातदेखील घडू शकत नाही, कारण हा पालखी सोहळा परंपरेचा पाईक आहे.
थोडावेळ माऊलींचा रथ थांबवला गेला. वारक-यांतील संवादामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं काम काही अराजकतत्त्वांनी केले; परंतु एकंदरीत ३० मिनिटांमध्ये सगळं विचारून आणि व्यवस्थितपणे होऊन सर्व विणेकरी माऊलींच्या रथासोबत नीरा मुक्कामी आले आणि सर्वांनी एकत्रितपणे भोजन आणि विश्रांती घेतली.
सध्या श्री माऊलींचा पालखी सोहळा हा वाल्हे नगरीमध्ये आहे आणि इथे देखील सर्व विणेकरी सर्व वारकरी अगदी आनंदाने एकत्रितपणे समाज आरतीमध्ये सम्मिलित झालेले होते.