
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : “आयुष्यात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध आणि कठोर परिश्रमांना पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कमकुवत गोष्टी ओळखून त्यांचे रूपांतर बलस्थानात केल्यास ते यशाचे शिखर गाठू शकतात,” असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की, “फलटण शहराला ऐतिहासिक वारसा असून, येथील दोन्ही महाविद्यालये आधुनिक आणि सर्व सोयींनी परिपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील अनुभवी प्राध्यापक वर्ग आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा पुरेपूर फायदा घेऊन आपले करिअर घडवावे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात उत्तम स्नेहबंध निर्माण करून विद्यार्थ्यांची प्रगती साधणे हे ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय समितीचे व्हा. चेअरमन शरदराव रणवरे यांनी भूषविले.
‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाअंतर्गत आठवडाभर विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहंदी, रांगोळी, गायन, एकांकिका, खो-खो, व्हॉलिबॉल अशा स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. सागर तरटे यांनी उपस्थितांना ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची शपथ दिली.