
स्थैर्य, सातारा, दि. 8 नोव्हेंबर : सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कार्यकारिणीच्या बैठकीनंतर निवडणूक प्रभारींची घोषणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे प्रभारी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे तर निवडणूक प्रमुख म्हणून धैर्यशील कदम यांची वर्णी लागली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत तसेच नगराध्यक्षपदांची संख्या सुद्धा भारतीय जनता पार्टीची जास्त असावी या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे संघटन कामाला लागले आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारिणीची बैठक होऊनत्या बैठकीद्वारे काही निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी देण्यातआली आहे.
कराड दक्षिणचे आ. डॉ. अतुल भोसले यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यांनी ऑपरेशन लोटस राबवत कराड व मलकापूर कार्यक्षेत्रात मोर्चेबांधणी सुरू ठेवली आहे. सातारा जिल्ह्याची जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे येथील राजकीय समीकरणे जुळवणे, भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणे, सहकारी आमदारांशी समन्वय ठेवून संघटन बांधणी मजबूत करत भाजपचे जास्तीत जास्त मतदान बूथ राहतील या दृष्टीने काम करणे इत्यादी जबाबदार्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.

