
स्थैर्य, फलटण, दि. २१ सप्टेंबर : “गेली पंधरा वर्षे बेघर आणि निराधार नागरिकांची सेवा मनोभावे केली, मात्र त्यांना एकाच छताखाली आणून अधिक चांगली सेवा देण्याचा मानस प्रशासकीय उदासीनतेमुळे पूर्ण होत नाही. बेघरांसाठी निवारा उभारण्यास जागा उपलब्ध करून दिली जात नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” अशी खंत मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत मोरे (मामा) यांनी व्यक्त केली.
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्थेच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या वतीने फलटण तालुक्यातील पत्रकार बांधवांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री. मोरे यांनी सांगितले की, निवाऱ्यासाठीच्या जागेकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडे सर्व पूर्तता करूनही जागा मिळत नाही. त्यांनी पत्रकार बांधवांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
यावेळी सत्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांच्या वतीने ‘युवा जनमत’चे पत्रकार श्री. युवराज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी ग्वाही दिली की, “मोरेश्वर संस्थेच्या या उदात्त कार्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव एकजुटीने प्रशासनाकडे पाठपुरावा करतील.”
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते श्री. बच्चू मेहता, ज्येष्ठ पत्रकार श्री. पोपट मिंड यांच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत मोरे, सचिव सौ. निर्मला मोरे, खजिनदार श्री. अक्षय तावरे, सल्लागार ॲड. सौ. शारदा दीक्षित आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला.