स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२३: कोरोना संसर्गामुळे यूपीएससीची पूर्वपरीक्षेची शेवटची संधी न मिळालेल्या उमेदवारांना आता पुन्हा संधी मिळणार नाही. केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयात ही माहिती दिली आहे.
ए.एम. खानविलकर, बी.आर. गवई व कृष्ण मुरारी यांच्या पीठाने केंद्राला या प्रकरणात शपथपत्र दाखल करून उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी २५ जानेवारीला होणार आहे. सनदी सेवेची तयारी करणाऱ्या काही उमेदवारांनी कोरोनाकाळाचे कारण देत याचिका दाखल केली होती. त्यांचे म्हणणे होते की, ऑक्टोबर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे यूपीएससीची पूर्वपरीक्षा देता आली नव्हती. यामुळे पुन्हा एक संधी मिळायला हवी.
कुणाला किती संधी : परीक्षेसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाच्या ३२ व्या वर्षापर्यंत ६ संधी मिळतात. इतर मागासवर्गीय श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाच्या ३५ व्या वर्षापर्यंत ९, तर अनुसूचित जाती-जमाती श्रेणीतील तरुणांना वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत ९ संधी मिळत असतात.