दैनिक स्थैर्य । दि. 10 जुलै 2022 । फलटण । कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने मोठी जीवितहानी झाली. दोन वर्षांपूर्वीचे प्रतिबंधित क्षेत्र, घरदार सोडून होत असलेले विलगीकरण या त्यावेळी नव्या असलेल्या संकल्पना आता कोरोनाचे अस्तित्व कायम असले आणि रुग्ण वाढत असले तरी बाद झाल्या आहेत. प्रशासन त्याबाबत उदासीन तर आहेच, शिवाय नागरिकांचीही आता निर्बंध पाळण्याची मानसिकता नाही.
मार्च २०२० पासून भारतात कोरोनाचा काळ सुरु झाला. बघता – बघता या महामारीने देश व्यापला. महाराष्ट्राने कोरोना बाधित, मृत्यूच्या आकड्यांत देशात अव्वल क्रमांक गाठला. सातारा जिल्हा राज्यामध्ये हॉटस्पॉट ठरला. कोरोनाची पहिली लाट एप्रिल ते सप्टेंबर २०२० अशी सहा महिने राहिली. या टप्प्यात उपचाराची पद्धती माहित नव्हती. लॉकडाऊन, बाधित रुग्णाचे घर व एक किलोमीटर परिघातील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र, रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांचे विलगीकरण अशा एक ना अनेक नव्या संकल्पना समोर आल्या. अनेकांचे जीव गेल्यानंतर लाट ओसरली.
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ ते जून २०२१ या चार महिन्यांच्या काळात आली. या लाटेने देशभरातील आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा उघड केल्या. या काळात प्रतिबंधित क्षेत्र वगैरे ही संकल्पनाच बाद झाली, कारण घराघरांत रुग्ण आढळून येत होते. दुसऱ्या लाटेतील अनुभवाने आरोग्य यंत्रणा शहाणी झाली. आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात आला. त्यातच देशी-विदेशी लसी आल्याने व नियोजनबद्धपणे लसीकरण अभियान राबविण्यात आल्यामुळे तिसरी लाट थोपविली गेली. मात्र, या लाटेत रुग्णवाढ होत असताना प्रतिबंधित क्षेत्र ही संकल्पना पूर्णपणे बाद झाली.
आता गेल्या महिनाभरापासून देशभरात रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातही रुग्ण वाढू लागले असून सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढतच आहे. मात्र, या रुग्णवाढीने का कुठे भीती आहे ना तणाव. उलटपक्षी आता सर्वच निर्बंधमुक्त झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांतील निर्बंधाच्या अनुभवात पोळलेले नागरिक निर्बंध पाळण्याच्या मानसिकतेत नाहीत. अगदी विलगीकरण संकल्पनाही राहिलेली नाही. ज्या घरात रुग्ण आढळला त्या घरातही तो स्वत: विलगीकरणात राहत नाही. कारण या रुग्णवाढीत लक्षणे नसलेल्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.