दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०९ नोव्हेंबर २०२१ | मुंबई | मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अत्यंत हीन पातळीचे राजकारण चालू आहे. त्यातच आज नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नसून, प्रत्यक्षात रत्नागिरीतील वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ती मालमत्ता दिल्लीतील अ‍ॅड. अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली आहे. त्या ठिकाणी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी ‘सनातन धर्म पाठशाळा’ नावाने गुरुकुल चालू करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. सनातन संस्था आणि अ‍ॅड्. अजय श्रीवास्तव यांचा कोणताही संबंध नाही.
त्यामुळे पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेसंदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करू नये. सनातन संस्था आणि दाऊद यांची एकत्रित चर्चा करून समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना महाराष्ट्र सरकारने समज द्यावी, अशी अपेक्षा आहे.
नवाब मलिक यांनी सनातन संस्थेचे नाव घेऊन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्यावर आतंकवादाच्या गुन्हेगारांकडून थेट जमीन घेतल्याचा आरोप झाला आहे, तर नवाब मलिक ज्या दाऊदच्या जमिनीचा उल्लेख करत आहेत, ती जमीन केंद्र सरकारने जप्त करून लिलाव केलेली आहे. त्यामुळे अ‍ॅड्. श्रीवास्तव यांनीही ती दाऊदकडून घेतलेली नसून सरकारी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे असत्य माहितीच्या आधारे स्वतःची लंगडी बाजू सावरण्याचा त्यांचा प्रयत्न उघडा पडला आहे. या संदर्भात सनातन संस्थेविषयी असत्य माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी नाईलाजाने आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा या प्रसिद्धीपत्रकाद्वारे आम्ही इशारा देत आहोत.

Back to top button
Don`t copy text!