कंपनी चालवताना कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नको : कामगार मंत्री ना. सुरेश खाडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑगस्ट 2024 | फलटण | फलटण तालुक्यामधील कमिन्स कंपनीसह इतर कोणत्याही कंपन्या जर कामगारांचा विचार न करता राजकारणी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप करत असतील तर सदरील कंपनीवर कडक कारवाई करण्यात येईल; असा कडक इशारा कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी दिला आहे.

कोळकी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित आढावा बैठकीत मंत्री ना. खाडे बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी व फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध कंपन्यांचे मुख्य प्रशासन अधिकारी उपस्थित होते.

तालुक्यातील कोणतीही कंपनीचा कोणत्याही पक्षाच्या साहाय्याने किंवा व्यक्तीच्या साह्याने जर चालत असेल तर अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कंपनीने त्यांचे काम करणे आवश्यक असून इतर बाबींमध्ये न जाता कंपनी चालवणे महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य कामगारांना कंपनी नियमानुसार पगार वितरण होते की नाही हे पडताळण्याची जबाबदारी सर्वस्वी कंपनीची आहे. जर पडताळणीमध्ये त्रुटी आढळत असतील तर कंपनीने सदरील कंत्राटदाराला काळे यादी टाकून त्याच्यावर कारवाई करावी; असेही मंत्री ना. खाडे यांनी स्पष्ट केले.

कामगार आयुक्त करणार फलटणमधील कंपन्यांची पडताळणी

फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कंपन्यांच्या अचानक पडताळणी करण्याचे आदेश यावेळी कामगार मंत्री ना. सुरेश खाडे यांनी कामगार आयुक्तांना दिले असून आयुक्तांनी जर पडताळणी करताना कोणतीही कसूर ठेवली किंवा कंपनीच्या बाजूने काम करण्याचा प्रयत्न केला तर कामगार आयुक्तांवर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा यावेळी मंत्री खाडे यांनी दिला.


Back to top button
Don`t copy text!