पन्नासाव्या बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळ्यात मदनदादांचा विश्वास
स्थैर्य, भुईंज, डी. 26 : किसन वीर कारखाना ही संस्था 50 हजार शेतकर्यांच्या मालकीची आहे. त्या तमाम शेतकरी सभासदांशी व कष्टकरी कामगारांशी प्राणपणाने बांधिलकी जपली आहे. राजकारण आणि सहकार याची गल्लत कधी केली नाही. तरीही येणार्या अडचणी येत राहिल्या. या अडचणीवर मात करण्याचा पुरुषार्थ दाखवला, त्यापासून मागे हटलो नाही, थांबलो नाही किंवा तसा विचारही मनाला कधी शिवला नाही. याच जिद्दीने आर्थिक प्रश्न निकाली लावण्यात यश येत असून किसन वीरचा 50 वा गळीत हंगाम यशस्वी होणारच. शेतकर्यांनी, कामगारांनी ज्या ताकदीने किसन वीरची पाठराखण केली त्याचं ऋण उभ्या जन्मात फिटणार नाही. अस्सल शेतकर्यांची हीच खरी ताकद असून किसन वीरच्या या शक्तीला कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी किसनवीरनगर येथे बोलताना व्यक्त केला.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या 50 व्या गळित हंगामाची जय्यत तयारी पुर्णत्वाच्या मार्गावर असून यंदाच्या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी पुढे बोलताना भोसले म्हणाले, जेव्हा उत्तम परिस्थिती होती तेव्हा हातचं राखून न ठेवता एफआरपीपेक्षा 325 कोटी रुपये अधिक शेतकर्यांना दिले. ते त्यांच्या हक्काचं होतं ही भावना कायम जपली. अपघात विम्यासह, अनुदानाच्या, सवलतीच्या किती योजना राबविल्या त्याची मोजदाद करायची म्हटलं तर वेळ पुरणार नाही. 20 गुंठ्याचा मालक असणारा शेतकरी कोटी सव्वाकोटीच्या ऊस तोडणी यंत्राचा मालक केला. निवडणुकीत कोणी कुठं काम केलं याची भनकसुद्धा कधी इथल्या कारभारात आणू दिली नाही. मात्र या गोष्टी काही ठराविक लोक विसरले असले तरी तमाम शेतकरी सभासद व कामगारांनी मात्र त्याच कामाच्या बळावर पाठबळ वाढवलं. आज दसर्यादिवशी सांगतो कोणी कितीही अफवा पसरवू दे त्याकडे दुर्लक्ष करुन शेतकर्यांच्या जोरावर शेतकर्यांचा कारखाना दणक्यात सुरु होणारच. अडचणी कोणाला येत नाहीत. मात्र अडचणी आल्या म्हणून हरणारा मदन भोसले नाही. कोणावरही एक शब्द न बोलता मी माझे काम करतोय. माझं दायित्व फक्त सभासदांशी आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी, सभासदांशिवाय इतरांना उत्तरं देत बसण्यात वेळ खर्ची घालवणार नाही. त्याच माझ्या पद्धतीमुळे यंदाचा हंगाम सुरु होण्यात कोणतीही अडचण उरली नाही. गेली काही वर्ष प्रत्येकवेळी अफवा उठवल्या गेल्या. ज्यांचा या कारखान्याला ऊस नाही, ज्यांचं काही घेणंदेणं नाही असे यात आघाडीवर. विरोधात आम्हीही होतो पण टिपरं कधी दुसर्या कारखान्याला घातलं नाही, कुणाला त्यासाठी उद्युक्त केलं नाही. केवळ सत्तेत असताना बांधिलकी जपणार्यातील मी नव्हे. आजच्या खासगीकरणाच्या रेट्यात शेतकर्यांची मालकी मोडीत काढण्याचा घायटा अनेकांना आहे. मी असेपर्यंत ते घडू देणार नाही. पाच तालुक्यातील शेतकर्यांच्या, कामगारांच्या बळावर किसन वीरला कोणीही रोखू शकणार नाही, याचाही भोसले यांनी पुनर्रच्चार केला.
प्रारंभी सभासद मितिन भालेराव भोईटे व सौ. अनिता मितिन भोईटे (मु. पो. वाघोली, ता. कोरेगांव), गजानन बुवासोा धायगुडे व सौ. पद्मा गजानन धायगुडे (रा. खेड बु, ता. खंडाळा), रामचंद्र यशवंत पवार व सौ. नंदा रामचंद्र पवार (रा. शेते, ता. जावली), प्रकाश महादेव कदम व सौ. संगिता प्रकाश कदम (रा. बावधन, ता. वाई) व राजेंद्र (बाबुराव) ज्ञानदेव जाधव व सौ. संगिता राजेंद्र जाधव (मु. पो. गोवे, ता. जि. सातारा) या उभयतांच्या हस्ते बॉयलर प्रज्वलित करण्यात झाला.
चंद्रकांत इंगवले यांनी प्रस्ताविक, नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन तर प्रताप यादव-देशमुख यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सौ. निलिमा भोसले, संचालक सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, प्रकाश पवार-पाटील, विजय चव्हाण, अरविंद कोरडे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, रोहिदास पिसाळ, अॅड. धनंजयराव चव्हाण, अॅड. विजयराव भोसले, मोहनराव साबळे, डॉ. दत्तात्रय फाळके, जयवंत साबळे, अॅड. मेघराज भोईटे, सुनिल शिवथरे, हणमंतराव गायकवाड, संभाजी शिंगटे, अनिल वाघमळे, आनंद जाधवराव, अमर धुमाळ, विशाल डेरे, बाबा खुडे, सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.