छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही; विधानाचा विपर्यास न करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । मुंबई ।  छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आज प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायांसंदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या विधानाचा विपर्यास करू नये. छत्रपती शिवरायांचे कार्य हे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला जातो. त्यामुळेच इस्त्राईलचे पंतप्रधान जेव्हा देशाच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी रायगडाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवरायांच्या युद्ध कौशल्यापासून प्रेरणा घेऊन इस्त्राईल आजपर्यंत उभे आहे. ही काही तुलना नव्हती. शिवरायांच्या कार्याशी कोणाचीही तुलना करता येऊ शकत नाही. त्यांचे कार्य सूर्यासारखे आहे. शासन सकारात्मक काम करत आहे. मी सुद्धा माझ्याकडील तीन विभागांमध्ये काय काय चांगले करता येईल, यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे.


Back to top button
Don`t copy text!