
स्थैर्य, सातारा, दि.४ : कण्हेर पाणीपुरवठा योजनेतून शाहूपुरीसाठी साडे चार हजार कनेक्शन्स् मंजूर केली असली तरी सुमारे 12 कोटी रुपयांचा वाढीव निधीही मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे त्यापेक्षा जास्त कनेक्शनची गरज भासल्यास, सर्वांना कनेक्शन देण्याची कार्यवाही प्राधिकारणाने करावी. कोणाचीही अडवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी, अशी सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
प्राधिकरणाचे प्रभारी मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांच्याकडून उदयनराजे भोसले यांनी कण्हेर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, संजय पाटील, माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, जितेंद्र खानविलकर, प्राधिकारणाच्या कार्यालयाच्या उपकार्यकारी अभियंता पल्लवी चौगुले तसेच अधिकारी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, नागरी पाणीपुरवठा योजनांचा लाभ देताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये, अशी सर्वमान्य धारणा आहे. शाहूपुरीचा काही भाग आता पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे वाढीव कनेक्शन्स् देण्याची कार्यवाही प्राधिकरण व पालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी. शाहूपुरीमधील कोणत्याही कुटुंबाची पाण्याच्या कनेक्शनअभावी अडचण होईल, असे कोणतेही कृत्य होणार नाही. याची काळजी प्राधिकरण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. वाढीव निधीतून या योजनेचे काम तातडीने पूर्ण करुन, योजनेचा लाभ देण्यास लवकरात लवकर सुरुवात करावी. मुख्य अभियंता श्री. भुजबळ यांनी लवकरच योग्य ती कार्यवाही करुन, नगरपरिषदेच्या सहकार्याने योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.