
स्थैर्य, फलटण, दि. २४ नोव्हेंबर : फलटण नगरपालिकेमध्ये कामाच्या पद्धतीत मोठी सुधारणा आणण्याचा ठाम निर्धार भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. ‘स्थैर्य’ला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. लोकांनी जर मला संधी दिली, तर माझ्या काळात सामान्य लोकांना ‘नगरपालिका आपली आहे’ असे वाटेल, असे काम करण्याचा माझा विचार आहे.
ते म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला आपुलकीने आणि चांगल्या प्रकारे पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल. नागरिकांसाठी एक दिलासादायक गोष्ट म्हणजे, पालिकेत बसवलेली लिफ्टची सोय आता सर्वांसाठी कायमस्वरूपी खुली ठेवली जाईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामावर माझे बारीक लक्ष राहील. ते कामावर वेळेवर येतात की नाही, हे पाहण्यासाठी हालचाल नोंदवही (रजिस्टर) सुरू केली जाईल.
आज लोकांना जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यासाठीही पालिकेत ताटकळत उभे राहावे लागते. ही परिस्थिती नक्की बदलवून दाखवेन, असे आश्वासन त्यांनी दिले. पालिकेचा कारभार सोपा आणि पारदर्शक करण्याची त्यांची योजना आहे. ते म्हणाले, कामाच्या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्यांवर माझा अंकुश राहील आणि लोकांची कामे वेळेत पूर्ण होतील.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी पालिका प्रशासनात बदल घडवण्याचा जो निर्धार व्यक्त केला आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. ‘सुशासन’ आणण्याच्या त्यांच्या या भूमिकेमुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला वेगळी दिशा मिळाली आहे.

