कासला जाणार्‍या पर्यटकांवर सरसकट कारवाई नको – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


पोलिसांनी हुल्लड बाजांवर कारवाई करावी; गृहमंत्र्यांच्या बैठकीत केली मागणी

स्थैर्य, सातारा, दि. 29 : कास पठार हे जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झालेले पर्यटनस्थळ आहे. कास तलाव आणि कास पठार येथे देशी, पयदेशी पर्यटकांसह स्थानिक लोक नेहमीच भेट देत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कासला जाणार्‍या पर्यटकांवर पोलीस प्रशासनाकडून सरसकट कारवाई केली जात असून हे चुकीचे आहे. पोलीसांनी सरसकट कारवाई न करता हुल्लडबाज, गोंधळ घालणार्‍यांवर कडक कारवाई करावी, समान्य लोकांना त्रास देवू नये, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहाजे भोसले यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली.

ना. देशमुख हे सातारा जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने उदभवलेली परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कास पर्यटकांवर होणार्‍या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पालकमंत्री बाळसाहेब पाटील, आ. मकरंद पाटील यांच्यासह सर्व आमदार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

कास पठार हे जागतिक पर्यटनस्थळ असून दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. देशी, परदेशी पर्यटकांसह स्थानिक पर्यटकही मोठ्या संख्येने या ठिकाणी जात असतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आणि कुटूंबीयांसमवेत विरंगुळा म्हणून शनिवार, रविवार, सुट्टीच्या दिवशी असंख्य सातारकर कासला जात असतात. कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाच्या निर्बंधांचे प्रत्येकाने पालन करणे बंधनकारक आहेच पण, गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाकडून कासला जाणार्‍या पर्यटकांवर सरसकट कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या पर्यटकांमध्ये लहान मुले, वयोवृध्द आणि महिला यांच्यावरही कारवाई करण्यात आली. पर्यटकांना काठीने मारण्याचा व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाला. हा प्रकार पुर्णपणे चुकीचा आहे.

कास हे सातारकरांचे आवडते पर्यटनस्थळ आहे आणि फार पुर्वीपासून सातारकर कास पर्यटनासाठी जातात. त्यामुळे सामान्य पर्यटकांवर कारवाई करणे अयोग्य आहे. हुल्लडबाज टोळक्यांवर, मद्य प्राशन करुन धिंगाणा घालणार्‍यांवर आणि बेदरकारपणे वाहने चालवणारांवर तसेच कोरोना संबंधीचे नियम मोडणारांवर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र पोलीस यंत्रणेने सरसकट कारवाई करुन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांना विनाकारण त्रास देवू नये, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. देशमुख यांच्याकडे केली आणि तशा सुचना पोलीस प्रशासनास देण्यास सांगितले. ना. देशमुख यांनीही याबाबत पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी सुचना उपस्थित अधिकार्‍यांना केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!