३५ वर्षांची परंपरा खंडित; जिल्हा परिषदेच्या आखाड्यात यंदा एकही ‘नाईक निंबाळकर’ नाही!


फलटणच्या राजकारणात ३५ वर्षांत पहिल्यांदाच मोठी घडामोड! जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिंगणात राजे कुटुंबियातील किंवा खासदार गटातील एकही ‘नाईक निंबाळकर’ उमेदवार नाही. का झाला हा बदल? वाचा आरक्षणाचे गणित…

स्थैर्य, फलटण, दि. 22 जानेवारी : फलटण तालुक्याच्या राजकारणावर गेली अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ‘नाईक निंबाळकर’ राजघराण्याच्या आणि राजकीय कुटुंबाच्या इतिहासात यंदा एक वेगळीच घटना घडली आहे. गेल्या तब्बल ३५ वर्षांच्या कालखंडात पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात ‘नाईक निंबाळकर’ राजे कुटुंबियातील किंवा अन्य नाईक निंबाळकर आडनावाचा एकही सदस्य उमेदवार म्हणून दिसणार नाही. बदललेल्या आरक्षणाच्या समीकरणांमुळे या दिग्गजांना निवडणुकीपासून लांब राहावे लागले असून, ३५ वर्षांची निवडणूक लढवण्याची अखंड परंपरा यंदा खंडित झाली आहे.

१९९१ पासूनची अविरत परंपरा

तालुक्याच्या राजकारणात नाईक निंबाळकर कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. सन १९९१ साली फलटण पंचायत समितीच्या सभापती पदापासून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्याच्या सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले होते. तेव्हापासून आजतागायत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कधी श्रीमंत संजीवराजे, तर त्यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर हे विविध गटांतून प्रतिनिधित्व करत होते. अगदी गेल्या पंचायत समिती निवडणुकीतही फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक लढवली होती आणि ते पंचायत समितीचे सभापती झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत या कुटुंबातील कोणीही उभे राहिलेले नाही.

दुसरीकडे, भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही गेल्या टर्ममध्ये गिरवी गटाचे नेतृत्व केले होते. त्यापूर्वी त्या पंचायत समिती सदस्यही होत्या. यंदा कोळकी जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते. मात्र, निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी पूर्वीच घेतला होता आणि तो कायम ठेवला. त्यामुळे खासदार गटाकडूनही नाईक निंबाळकर कुटुंबातील व्यक्ती रिंगणात नाही.

आरक्षणाने फिरवली गणिते!

दिग्गजांनी रिंगणातून माघार घेण्यामागे किंवा उमेदवार नसण्यामागे यंदाचे ‘आरक्षण’ हे प्रमुख कारण ठरले आहे.

  • गेल्या १० वर्षांत फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेचे बहुतांश गट हे ‘सर्वसाधारण’ (Open) किंवा ‘सर्वसाधारण महिला’ असे आरक्षित होते, ज्यामुळे या नेत्यांना संधी मिळत होती.

  • मात्र, यंदाचे चित्र पूर्णपणे वेगळे आहे. तालुक्यातील ८ गटांपैकी तब्बल ४ गट अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव आहेत, तर २ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (OBC) राखीव आहेत.

  • केवळ २ गट (कोळकी आणि हिंगणगाव) हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी (Open) सुटले आहेत.

जागांची ही कमतरता आणि आरक्षणाचे व्यस्त गणित यामुळेच यंदा ३५ वर्षांत पहिल्यांदाच ‘नाईक निंबाळकर’ घराण्यातील कोणीही उमेदवार जिल्हा परिषदेच्या बॅलेट पेपरवर दिसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!