दैनिक स्थैर्य | दि. १४ जुलै २०२३ | फलटण | फलटण – कोरेगाव, माण – खटाव यासह संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेले सिंचनाचे सर्व प्रकल्प केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प मार्गी लावले असून आता आगामी काळामध्ये कोणालाही पाणी प्रश्नावर निवडणूक लढवता येणार नाही; असे स्पष्ट मत खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टी प्रदेशचे प्रतिनिधी जयकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संयोजक सचिन कांबळे, युवा नेते लतीफभाई तांबोळी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या महिन्यात फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची कामे मार्गो लागली आहेत. त्यामध्ये फलटण ते बारामती रेल्वे, धोम – बलकवडी प्रकल्प बारमाही करण्याचे टेंडर, नीरा – देवधरचे विविध सुमारे 550 कोटी रुपयांचे टेंडर व त्यामध्ये अजून सुमारे 200 कोटींचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. काल कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रकल्पला काल राज्य सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. याचे फक्त सर्वेक्षणचे टेंडर सुमारे 50 कोटींच्यावर आहे. कृष्णेचे पाणी भीमेला आता फलटणमार्गे जाणार आहे. यामध्ये कृष्णेचे पाणी नीरा नदीत बाणगंगा नादिमार्गे जाणार आहे; यामध्ये जवळपास 5 TMC अतिरिक्त पाणी हे फलटण तालुक्यासाठी आरक्षित करणार आहे. यामध्ये बाणगंगा धरण भरून सुद्धा बाणगंगा नदी बारमाही करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत; असेही खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.