आता ऑनलाईन लर्निंग नको; पुन्हा शाळाच भरवा : पालक वर्गातून अपेक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । सध्या राज्य सरकारने राज्यातील ज्या गावामध्ये सलग तीस दिवस एकही रुग्ण सापडला नाही अश्या गावांमध्ये शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुले घरी राहून चिडचिडे होत आहेत. ऑनलाईन लर्निंगच्या नावाखाली मोबाईलच्या आधीन जात आहेत. ह्या सर्व प्रकारामुळे पालक हैराण होत आहेत. ‘आता ऑनलाईन लर्निंग नको; पुन्हा शाळाच भरवा’ अशी अपेक्षा आता पालक वर्गातून व्यक्त होत आहे

सध्याच्या काळामध्ये कोरोनाची भीती वाढत असली तरी मुलांच्या शिक्षणाचा पाया सुद्धा भक्कम होणे गरजेचे आहे. ऑनलाईन लर्निग मध्ये शिक्षणाचा पाय भक्कम होऊ शकेल याबद्दल अजूनतरी साशंकता आहे. शिवाय या शिक्षण पद्धतीत मुलांच्या एकाग्रतेवरही प्रश्‍नचिन्ह असून मुले टंगळ मंगळ करत ऑनलाईन शाळेमध्ये उपस्थिती नोंदवत असल्याचे अनेक पालकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाबाबत एकीकडे साशंकता व्यक्त होत असली तरी दुसरीकडे मात्र सद्यस्थितीत शाळा सुरु होण्यासाठी तीस दिवस एकही रुग्ण सापडणार नाही अशी गावे निदान फलटण तालुक्यात तरी सापडणे अवडघच दिसत आहे.

याबाबत प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधला असता, ‘‘फलटण तालुक्याचा विचार केला तर फलटण तालुक्यात आज मितीला एकही असे गाव नाही कि तिथे सलग 30 दिवस एकही नवा रुग्ण कोरोनाचा सापडला नाही. एकाद्या गावामध्ये नवा रुग्ण सापडला कि 30 दिवसांची नोंद परत पहिल्यापासून करावी लागत आह’’े, अशी माहिती फलटणचे गटशिक्षण अधिकारी रमेश गंबरे यांनी स्थैर्य शी बोलताना दिली.

ही जर परिस्थिती अशीच राहिली तर फलटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना यंदाही लॉग इन करूनच शाळेत आपली हजेरी नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत जाऊन शिक्षण घेता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ऑनलाईन शिक्षण जरी फायदेशीर ठरत असले तरी ऑनलाईन शिक्षणाचा मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर झाल्याचे गेल्या काही काळात दिसून आले आहेत. शिवाय ऑनलाईन शिक्षण पद्धती जितकी शहरी भागात सुकर आहे त्याच्या उलट तितकीच ती ग्रामीण भागात अवघड देखील आहे. तांत्रिक अडचणी, साधनांचा अभाव या गोष्टी केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही ग्रामीण भागात अडसर ठरणार्‍या आहेत. त्यामुळे आपला पाल्याने संगणक, मोबाईलच्या साथीने शिक्षण घेण्यापेक्षा दप्तर घेऊन वर्गातच बसून तो लवकर शिकावा; अशी अपेक्षा पालक वर्गामधून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!