२२ दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही – ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ मे २०२२ । नाशिक । जगासह भारतातील अनेक राज्यात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक राज्यात भारनियमन होत असून प्रचंड तापमान व विजेची मागणी वाढली आहे. ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्र येऊन केलेले कार्य व योग्य नियोजनामुळे महाराष्ट्रात मागील २२ दिवसापासून भारनियमन होत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात नवीन ३३/११ केव्ही डहाळेवाडी उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा डॉ नितीन राऊत यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

दुर्गम भागात ४ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या विद्युत उपकेंद्रामुळे या भागातील ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे.

या उपकेंद्रामुळे वावीहर्ष, टाकेहर्ष, डहाळेवाडी, चंद्राचे मेट कळमुस्ते, अस्वलीहर्ष, दाडोशी, उमेशीमेट, बर्डेचीवाडी या आठ गावांतील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठयाचा लाभ होईल. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विद्युत उपकेंद्रातील परिसरातील नामफलकाचे अनावरण, पॉवर ट्रान्सफॉर्मरचे पूजन आणि आवारात वृक्षरोपण करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार हिरामण खोसकर, महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, महापारेषणचे मुख्य अभियंता राजेंद्र गायकवाड, राजाराम पानगव्हाणे, किरण जाधव, जिल्हा परिषद सदस्य विनायक माळेकर उपस्थित होते.

आज तापमानात वाढ होत असताना विजेच्या मागणीनेही उच्चांक गाठला आहे. वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा व बाजारातून रोखीने वीज विकत घ्यावी लागते. तसेच कोळसा वाहतुकीला, प्रशासकीय कामकाजाला व पगाराला दरमहा पैसे लागतात. मात्र अनेक ग्राहक इतर सेवांचे आधी पैसे मोजतात पण वीज बिल भरताना दुय्यम स्थान देतात अशी खंत डॉ राऊत यांनी व्यक्त केली.

महावितरण ही वीजवितरणासोबत रात्र अन दिवस सेवा देणारी कंपनी आहे. कोरोना काळात, अतिवृष्टी व महापुरातही राज्यामध्ये अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली आहे. वीज पुरवठा करणे हे कार्य महावितरणचे असल्याने ग्राहकांनीसुद्धा आपली वीज बिले वेळेत भरून कंपनीला वीज कापण्याची संधी देऊ नये. तसेच अनेक गावामध्ये पथदिव्यांवरील दिवे दिवसा सुरु असल्यामुळे विजेचा गैरवापर होतो व अनावश्यक बिल वाढते. त्यामुळे विजेचा वापर काटकसरीने करावा, असे कळकळीचे आवाहन ऊर्जामंत्री राऊत यांनी केले.

आमदार हिरामण खोसकर यांनी ऊर्जामंत्री राज्यात करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत या दुर्गम भागात विद्युत उपकेंद्र निर्माण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. वीजसेवा वापरल्यानंतर ग्राहकांनी वीजदेयकेसुद्धा वेळेत भरून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी तर आभारप्रदर्शन पायाभूत आराखड्याचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे यांनी केले. कार्यक्रमाला अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, रमेश सानप व सुनिल काकडे, कार्यकारी अभियंते माणिकलाल तपासे व निलेश चालीकवार, सरपंच निलेश जाखेरे व परीसरातील नागरिक यांचेसह लोकप्रतिनिधी व महावितरण व  महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!