रुसवे-फुगवे नाहीत, फक्त विजयाचा ध्यास; मांढरे, माळवे, शहा यांचा सिद्धाली शहांना खंबीर पाठिंबा!


स्थैर्य, फलटण, दि. 19 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीने (खासदार गट) एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी पक्षांतर्गत लोकशाहीचा मान राखत, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या इतर मान्यवरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. फलटण शहराच्या राजकीय इतिहासात उमेदवारी जाहीर होताच इतर इच्छुकांशी असा सौहार्दपूर्ण संवाद साधणारी आणि एकीचा संदेश देणारी सिद्धाली शहा या पहिल्याच उमेदवार ठरल्या आहेत.

प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पार्टीचे तिकीट मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक होते. यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे, माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांनी पक्षाचे नेते व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली होती. मात्र, पक्षाने सिद्धाली अनुप शहा यांच्या नावार शिक्कामोर्तब केले.

नेहमीच्या राजकारणात तिकीट न मिळाल्यास नाराजीनाट्य किंवा बंडखोरी पाहायला मिळते. मात्र, सिद्धाली शहा यांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका घेत उमेदवारी अर्ज अंतिम झाल्यावर या सर्व जेष्ठ आणि तरुण नेत्यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. केवळ भेटच घेतली नाही, तर त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शनाची विनंती केली. त्यांच्या या कृतीने पक्षात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भेटीदरम्यान माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे यांनी सिद्धाली शहा यांचे कौतुक केले. “पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला मान्य असून, प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने तुझ्या पाठीशी उभे राहू,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला. जेष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या या आशीर्वादामुळे सिद्धाली शहा यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.

तसेच, माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांनीही या वेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. “निवडणूक ही केवळ एका व्यक्तीची नसून विचारांची आहे. त्यामुळे गट-तट विसरून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काम करू,” असे आश्वासन या नेत्यांनी दिले. यामुळे प्रभाग क्र. ८ मध्ये भाजप एकसंघ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. अनुप शहा यांनी आपल्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत रूढ केली होती, त्याचेच प्रतिबिंब आजच्या या भेटीगाठीत दिसून आले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्ते आणि इतर इच्छुकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले.

फलटण शहरात सध्या या भेटीगाठींची जोरदार चर्चा सुरू आहे. सहसा निवडणुकीत तिकीट वाटपानंतर होणारी नाराजी दूर करण्यासाठी नेत्यांना कसरत करावी लागते. मात्र, सिद्धाली शहा यांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘संवाद आणि सन्मान’ या सूत्राचा वापर करत सर्वांना आपलेसे केले आहे. हा नवीन पायंडा फलटणच्या राजकारणात निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.

आता प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नेत्यांच्या एकीच्या बळावर सिद्धाली अनुप शहा यांचा विजय सुकर मानला जात आहे. मतदारांमध्येही या एकीचा सकारात्मक संदेश गेला असून, त्याचा फायदा मतपेटीतून नक्कीच दिसून येईल.


Back to top button
Don`t copy text!