स्थैर्य, वाई, दि. २१ : वाई नगरपरिषद हद्दीमध्ये आणि शहरालगत मोठ्या प्रमाणात करोना चे रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात अचानक एका दिवशी 28 रुग्ण सापडल्यामुळे वाई नगरपरिषद हद्दीमध्ये आणि शहरालगत संबंधित रुग्ण व त्यांच्या अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींचा ज्या परिसरात वावर झालेला असल्याने वाई उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी तथा इंन्सिडेंट कमांडर संगीता राजापूरकर- चौगुले यांनी संपूर्ण वाई शहर 15 जुलै पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शहरामध्ये कोणाही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही तसेच शहरातील कोणाही व्यक्तीला शहरातून बाहेर पडता येणार नाही अशी माहिती वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.
नागरिकांची जीवनावश्यक वस्तू तसेच दैनंदिन गरजा याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी त्या, त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य, त्या प्रभागातील काही स्वयंसेवक आणि नगरपरिषदेने त्या प्रभागासाठी नेमलेले नियंत्रण अधिकारी यांची मिळून प्रभागस्तरीय समिती गठीत केली आहे. शहरामध्ये अशा एकूण 10 समित्या असून त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य तिचे अध्यक्ष आहेत. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व बाजूंच्या रस्त्यांच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद ठेवण्यात येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत. नगरपरिषदेच्या सर्व प्रभाग स्तरीय समित्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपलब्ध करून दिली असून घरपोच सुविधेमार्फत दूध, किराणा माल, भाजीपाला, औषधे, खते, बी-बियाणे इ. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल याची दक्षता संबंधित प्रभाग समितीचे अध्यक्ष घेत आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागामध्ये प्रभाग समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची नावे, मोबाईल नंबर असे तपशीलवार बोर्ड लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सूचनांचे देखील बोर्ड लावण्यात आले आहेत. त्या सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांना या संदर्भात कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी आपापल्या प्रभाग समिती अध्यक्षांशी संपर्क साधावयाचा आहे. याशिवाय नगरपरिषदेने प्रभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथके नेमलेली आहेत. अडचण भासल्यास त्यामधील सदस्यांना देखील नागरिक संपर्क करू शकतात. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणाही व्यक्तीला शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही तसेच शहरातून कोणालाही बाहेर सोडले जाणार नाही. करोना संसर्ग टाळण्यासाठी वाई शहरामध्ये मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या कोणाही व्यक्तीला विनापरवाना प्रवेश दिला जाणार नाही. अशा व्यक्तीना चेकपोस्ट वरूनच परत पाठविले जाणार आहे. पोलीस प्रशासनातर्फे या सर्व चेकपोस्टवर आणि संपूर्ण वाई शहरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला आहे. पूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे शहरामध्ये संपूर्ण शहराचे दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे. सदर सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी सर्वेक्षण करणार्या व्यक्तींना सहकार्य करून जर काही आजार असल्यास अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास असल्यास त्याची माहिती त्वरित द्यावी आणि त्यांची तपासणी ही योग्य त्या डॉक्टरकडून केली जाईल. सर्वेक्षण करताना तापमान तसेच पल्स व ऑविसमीटरच्या सहाय्याने ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जात आहे. यामध्ये कोणी व्यक्ती आजारी असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा कोमॉबीड आढळलेल्या लोकांना त्वरित हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यांची तपासणी ग्रामीण रुग्णालयामार्फत केली जात आहे. या व्यतिरिक्त कोणाला, काही त्रास आढळल्यास त्यांनी त्वरित नगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी अथवा ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
शहरात प्रवेश करताना केली जाणार नोंद वाई शहरच्या सीमेवर येणार्या- जाणार्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी वाई-सातारा रस्त्यावरील कला गार्डन हॉटेल, महाबळेश्वर-वाई रस्त्यावरील गांधी पेट्रोल पंप, मेणवली रोडवरील श्रद्धा स्टोन समोर आणि पसरणी रस्त्यावरील सुतार घराजवळ असे एकूण 4 चेकपोस्ट तयार करण्यात आले असून 24 तास चेकपोस्ट सुरू राहणार आहेत.– मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ