आता सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधव विधिमंडळ पायऱ्यांवर झाले नतमस्तक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । मुंबई । विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाचा हा अंतिम आठवडा असून सभागृहात बोलू दिले जात नाही असा आरोप करत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे विधानसभेतून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भास्कर जाधव हे नतमस्तक झाले आणि आता या सभागृहात येण्याची इच्छा नाही म्हणत तिथून निघून गेले.

आमदार भास्कर जाधव म्हणाले की, आज मी सभागृहातून बाहेर पडलो. उद्या गुढीपाडवा आहे त्यानंतर ३ दिवस सभागृह आहे. मी गावी निघालोय आणि पुन्हा येणार नाही. कारण येण्याकरिता इच्छा राहिली नाही. भास्कर जाधव एकही दिवस सभागृह चुकवत नाही. मात्र यंदा मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. मला विषय मांडू दिले जात नाही. नियमाने बोलण्याचा, सभागृह कायद्यानुसार चालवण्यासाठी मी आग्रही आहे.

तसेच अधिवेशन, कामकाज नियम कायदा परंपरा, घटनेनुसार चालावे असं मला वाटते. माझ्या २ लक्षवेधी लागाव्यात यासाठी प्रयत्न करूनही एकही लक्षवेधी लागली नाही. त्यामुळे मनात वेदना आहेत. मला सभागृहात बोलायला दिले असते तर महत्त्वाचा मुद्दा मांडणार होतो. कोकणातील रस्ते चांगले करण्यासाठी अभ्यास गट नेमा, अधिकाऱ्यांचे काळे धंदे उघड होतील हे मला सांगायचे होते. विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतायेत. कोकणावरही अनेक संकटे आली. महापूर आली, चिपळूण, महाड बाजारपेठ पाण्यात बुडाली, कोट्यवधीची नुकसान झाली, आमचा शेतकरी उद्ध्वस्त झाला. पण देवाच्या कृपेने कोकणातील एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. या लोकांची मानसिकता संकटाच्या विरोधात उभे राहण्याची मानसिकता. अशी कुठून आत्मनिर्भरता येते. वाटेल ते झाले तरी चालेल आत्महत्येचा विचार करायचा नाही. याचा अभ्यास करण्यात यावा. त्यातून विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात हे विषय मला सभागृहात मांडायचे होते पण मला बोलू दिले नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलं.

दरम्यान, विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे. सातत्याने अवकाळी पावसाला सामोरे जावे लागले. पिकाला भाव मिळत नाही. हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येला सामोरे जावे लागते. अशी वेळी कुणावरही येऊ नये. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हीच आमची भावना आहे असंही भास्कर जाधव म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!