दैनिक स्थैर्य | दि. १ जानेवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, फलटण व मुधोजी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षाच्या स्वागतासाठी आरोग्याविषयीची जनजागृती करण्यासाठी ‘दारू नको… दूध प्या…’, या उपक्रमाचे आयोजन करून करण्यात आले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्ष ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ या मोहिमेंतर्गत प्रबोधन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला ‘दारू नको… दूध प्या…’ हा उपक्रम मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे साजरा करण्यात आला.
भारताची तरुण पिढी सुशिक्षित आहेच; परंतु ती निर्व्यसनी असण्यासाठी ‘दारू नको, दूध प्या’ या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना दारूचे, विविध व्यसनाचे गंभीर परिणाम सांगण्यात आले व दुधाचे वाटप करण्यात आले. नववर्षाची सुरुवात दारू पिऊन नव्हे तर दूध पिऊन करा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुधोजी महाविद्यालय यांच्यामार्फत करण्यात आले.
याप्रसंगी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम, उपप्राचार्य प्रा. ज्ञानदेव देशमुख, प्रा. डॉ. प्रभाकर पवार, प्रा. रणधीर मोरे, प्रा. सौ. नीलम देशमुख व त्यांचे सर्व सहकारी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती फलटणचे आनंद देशमुख, आत्माराम बोराटे, सचिन काकडे, सौ. मंदाकिनी गायकवाड, सौ. मोहिनी भोंगळे, सौ. आरती कांबळे यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.