दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । सातारा । जगभरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ओमीक्रॉन विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आहे. शंभर टक्के मास्कचा वापर आणि लसीचे दोन डोस पूर्ण करणाऱ्यांनाच शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखरसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. मास्क नसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी देत त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ओमीक्रॉन विषाणू संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेतली. या बैठकीत जे प्रतिबंधात्मक उपाय निर्देशित झाले त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर शिंह म्हणाले की, ओमीक्रॉन हा विषाणू 24 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेत बोट स्वाना येथे आढळून आला . करोनाच्या डेल्टा विषाणूला मात देणारा हा विषाणू तीस पट अधिक संक्रमणशील असल्याने परदेशात संसर्गाची भीती वाढली आहे. केंद्र शासन व आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे परदेशातून पुणे व मुंबई येथून येणाऱ्या नागरिकांचे विमानतळावर संस्थात्मक विलगीकरण करून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. याशिवाय टेस्ट निगेटिव्ह आली तरी सात दिवस त्यांना विशेष निगरानीत ठेवले जाणार आहे . नागरिक ज्या जिल्ह्यात जाणार असून त्यांनाही त्याची माहिती दिली जाणार आहे. संबधित क्षेत्रातील आरोग्य यंत्रणांनी या व्यक्तींवर आठवडाभर विलगीकरणात ठेऊन त्यांचे स्क्रिनिंग करावयाचे आहे. शेखर सिंग पुढे म्हणाले, डेल्टानंतर ओमीक्रोन हा विषाणू संक्रमित झाला आहे.
आपल्या देशात अजून एकपण ओमीक्रोनचा रुग्ण सकाळपर्यंत नाही. डब्ल्यूएचओच्या संदर्भानुसार डेल्टा 80 दिवसांनी आला पण ओमीक्रोनचे केसेस येण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतात. या व्हायरसला रोखण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. आरटीपीसीआरची चाचणी वाढवावी लागणार आहे. आजमितीस जिल्ह्यात5 हजार चाचण्या होऊ शकतात.
अॅटिजेन टेस्ट ही या सोबत करत आहे.
जंबो हॉस्पिटल 31 ऑक्टोबर पासून बंद करण्यात आले आहे. पण रुग्ण संख्या वाढताच जम्बो हॉस्पिटल पुन्हा पूर्ववत करणार आहोत. याशिवाय कराड फलटण वडूज सातारा दहिवडी येथे मिनी जंबो हॉस्पिटल्सद्वारे सहाशे बेडची तसेच लहान मुलांसाठी सातारा व कराड फलटण येथे प्रत्येकी पन्नास बेडची विशेष व्यवस्था राहणार आहे .
1700 मेट्रिक टन गॅस उपलब्ध आहे.
मेडिकल ऑक्सिजनसाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात आहे.16 प्लॅन्ट जिल्ह्यात उभारत आहोत सध्या ऑक्सीजनची मागणी 60 किलोलीटर असून याची क्षमता 165 ते170 लीटरपर्यंत वाढविली जाऊ शकते. जिल्ह्यात 1700 टन किलोलीटर ऑक्सीजन उपलब्ध करून उपचारांमध्ये कुठे त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
आपल्या जिल्ह्यात 22 लाख 79 लाख लोकांचे लसीकरण झाले असून याचे प्रमाण 89% आहे तर 11 लाख लोकांनी नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे . त्यामुळे राज्यात सातारा जिल्हा पाचव्या क्रमांकवर आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग व शंभर टक्के मास्कचा वापर या गोष्टीची सक्ती केली जाणार आहे. दंडात्मक कारवाया करण्यासाठी नगरपालिका व जिल्हा परिषद पातळीवर टास्क फोर्स तयार करून कारवाई केली जाणार आहे. किमान लसीचा एक डोस आणि मास्क नसल्यास यापुढे साताऱ्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही व मास्क न वापरणाऱ्याला पाचशे रुपये दंड तर या नियमांचा भंग करणारी हॉटेल्स व मंगल कार्यालयांना दहा हजार रुपये दंड केला जाणार आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विशेष व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करून त्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी ते करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
अजयकुमार बन्सल म्हणाले, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांची सर्वांनी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. गर्भवतीनेही वॅक्सीन घेतलं पाहिजे. त्यामुळे जन्माला येणारे बाळही सुरक्षित असणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, यात्रा उत्सव आता गांवच्या यात्रा गावापूरते करावे, जास्त गर्दी करू नये त्याचबरोबर देवदर्शनच्या वेळाही स्थानिक पातळीवर ठरवाव्यात. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन बाबत शासनाचा आदेश येईल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल. वाहतूक व्यवस्थेला आता पर्याय नाही. त्यामुळे खासगी वाहनाने जाताना सोशल डिस्टन्सबाबत राज्यस्तरावर लवकरच तोडगा निघेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले .विवाह समारंभ शासनाकडून मार्गदर्शक सूचना येतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फिजिशियन नाही.
याबाबत काय करणार आहात या प्रश्नावर बोलताना डॉ सुभाष चव्हाण म्हणाले, करार तत्वावर एमडी डॉक्टर उपलब्ध करण्यात येत आहेत. सिव्हिलमध्ये 242 बेड संख्या आहे. येथे गेल्या दीड वर्षांपासून लिफ्ट नाही याबाबत पाठपुरावा ही सुरू आहे. पण दुरुस्त होत नाही. या प्रश्नावर बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले, त्यासाठी लवकरच दुरुस्त करू. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.