स्थैर्य, दि.२६: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील 18 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. आभासी माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत होते. यावेळी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह, अर्जुनराम मेघवाल, कैलाश चौधरी, माजी केंद्रीय मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि राज्यातले अनेक मंत्री उपस्थित होते.
या प्रकल्पांमध्ये सुमारे 1127 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 8,341 कोटी रुपये खर्च येणार आहे. या प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यानंतर राज्यांतर्गत व्यावसायिक मालाची वाहतूक अधिक सुकर होणार आहे. तसेच सीमाभागामध्ये संपर्काचे चांगले जाळे तयार होईल. या रस्त्यांच्या कामामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे. पर्यटनाला चालना मिळणार असून पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे. या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर कृषी उत्पादने मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार आहे.
याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य देण्यात येईल. राज्यातल्या प्रत्येक खासदाराने दोन आणि आमदाराने प्रत्येकी एका रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना केले. रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावाला त्वरित मान्यता मिळण्यासाठी ते थेट आपल्याकडे पाठवावेत, म्हणजे त्यांची तपासणी आपण करून तातडीने करू आणि ते मंजूरही करू, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. रस्ते विकास क्षेत्रामध्ये गडकरी यांनी केलेल्या अभूतपूर्व उपक्रमांचे गेहलोत यांनी यावेळी कौतुक केले.
गेल्या सहा वर्षात राजस्थानात रस्ते बांधकामामध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. राज्यात 10,661 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले आहे. राज्यातले सर्व जिल्हे आता राष्ट्रीय महामार्गाला जोडले गेले आहेत. गेल्या सहा वर्षात 186 रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यामध्ये 7906 किलोमीटर लांबीच्या मार्गांसाठी 73,583 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या काळामध्ये राज्यातल्या 5,154 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले, त्यासाठी केंद्र सरकारने 30,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. राजस्थानात आणखी एक लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे करण्यात येणार आहेत. सन 2021-22 पर्यंत आता आणखी 27000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात येणार असून त्यासाठी 35,000 कोटी रूपये खर्च येणार आहे. या व्यतिरिक्त आणखी 30,000 कोटी खर्चून 2500 किलोमीटर महामार्ग तयार करण्यात येणार आहे, हे काम 2023-24 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर 2,811 किलोमीटर महामार्गाच्या कामांसाठी 50,000 कोटी खर्च येणार असून त्यासाठी डीपीआर तयार करण्यात येत आहे.
भारतमाला परियोजनेतून राजस्थानात 1,976 किलोमीटर महामार्गाचे काम करण्यात येणार असून त्यासाठी 32,302 कोटी रूपये खर्च अपेक्षित असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी जाहीर केले. तसेच वेगवेगळ्या 14 प्रकल्पांचा तपशील अहवाल पूर्ण झाला असून यामध्ये 800 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम करण्यात येणार आहे, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.