“नितेश राणेंनी काँग्रेस नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा तुमच्याच भाषेत वस्त्रहरण करू’ काँग्रेसचा इशारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन व कुख्यात गुंड दाऊदशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वाह्यात बडबड केली त्यावरूनच त्यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. दररोज कोणाला तरी अर्वाच्च शिव्या देण्यापलिकडे राणेंना काही येत नाही. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मुक्ताफळे नितेश राणे यांनी उधळली आहेत. राहुल गांधी हे सरकारी घरातच राहून देशाविरोधात बोलतात असेही नितेश राणे म्हणाले. राहुलजी हे दिल्लीत सरकारी घरातच राहताच, अंधेरीतील राणेंच्या राजमहालासारख्या अवैध बांधकाम केलेल्या घऱात ते रहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे कारण ते गांधी आहेत राणे नाहीत. नेहरु-गांधी परिवाराने देशासाठी केलेला त्याग व बलिदान राणेसारख्या सुमार बुद्धीच्या लोकांना या जन्मीतरी समजणे शक्य नाही.

आमदार नितेश राणेंनी राहुलजी गांधी यांची तुलना दहशतवादी लादेन, माफिया दाऊदशी केली त्याच राहुल गांधींच्या हाताखाली नितेश यांचे पिताजी नारायण राणे यांनी दहा-बारा वर्षे काम केले आहे याची त्यांना माहिती नाही का? नसेल तर नितेश यांनी वडिलांना विचारुन घ्यावे. नितेश राणे यांच्या बोलण्याला महत्व देण्याची फारशी गरज नाही पण त्यांनी आमच्या नेत्यांबद्दल विचार करुन बोलावे अन्यथा आम्हालाही तुमच्याच भाषेत उत्तर देऊ तेंव्हा तुम्हाला तोंड लपवायला जागा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा, असेही अतुल लोंढे यांनी ठणकावून सांगितले.


Back to top button
Don`t copy text!