दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑगस्ट २०२४ | फलटण |
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधिनस्त कृषी विज्ञान केंद्र रोहामार्फत आणि कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या ‘निसर्गमित्र’ गटाने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कोशिंबळे गावात जैव खत म्हणून ‘अझोला’ उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते.
यावेळी अझोला लागवडीबद्दल माहिती देण्याबरोबरच अझोला कसा वाढवायचा, अझोला तळे कसे बनवायचे आणि अझोला वापरल्यास होणारे फायदे समजावून सांगितले. शेतकर्यांना अझोलाचा नमुना सुद्धा दाखवला. अॅझोला भाताची रोपे लावण्यापूर्वी म्हणजेच लागवडीच्या २-३ आठवड्यांपूर्वी वापरले जाते किंवा लावणीनंतर जर शेतामध्ये पाण्याची पातळी असेल तर त्या पाण्यामध्ये अझोला वापरला जातो. हे कुजल्यानंतर वातावरणातील नायट्रोजन जमिनीत स्थिर करण्यास मदत करते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांची गरज कमी होतेे. अझोला जमिनीतील ओलावा टिकवून ठेवू शकतो ज्यामुळे भात लागवडीला फायदा होतो. अझोलाचा मुख्यतः वापर पशूंचा आहार म्हणून केला जातो. अझोलाची कापणी प्लॅस्टिकच्या १ ते २ सेमी जाळीच्या आकाराची छिद्रे असलेल्या ट्रेमध्ये करतात आणि शेणाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी अझोला धुवावा. आझोलाचा खाद्य म्हणून परिचय देताना, ताजे अझोला १:१ च्या प्रमाणात जनावरांच्या खाद्यामध्ये मिसळून खायला द्यावे. अझोला कोंबड्यांना सुद्धा खायला दिले जाऊ शकते. याच्या वापरामुळे जवळपास २० टक्क्यांपर्यंत दूध उत्पादनात वाढ होऊ शकते.
कोकणात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात अझोला वापरण्याबाबत शेतकर्यांच्या मनात शंका होती. म्हणून रब्बी हंगामात भातामध्ये अझोला वापरण्याची सूचना केली. या प्रात्यक्षिकाला गावातील शेतकर्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. वरील कार्यक्रमाचे आयोजन सुमेध वाकळे, अनिश जगताप, जीवन गोडसे, आकाश जाधव, अनिकेत काजरेकर, लक्ष्मण माळगी, रिषभ मोरे यांनी केले. यासाठी कृषी विज्ञान केंद्र, रोहा केंद्रप्रमुख डॉ. मनोज तलाठी सर व ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी जीवन आरेकर सर, विषयतज्ज्ञ डॉ. व्ही. जी. चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.