दैनिक स्थैर्य | दि. 10 जुलै 2024 | फलटण | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून कर्तव्य वीस वर्षांपासून निर्मल वारीसाठी पालखी पुढे गेल्यानंतर पालखी तळाची स्वच्छता करण्यात येते हा उपक्रम स्तुत्य असून अशामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वारकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळण्याचे काम होत आहे असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले.
फलटण येथील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या “सरोज – व्हीला” या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ. अशोक शिंदे बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. राजकुमार रिकामे, डॉ. विकास कर्डिले, डॉ. सारिका मोहोळ, डॉ. सुनील मोहिते, डॉ. तांबे यांच्यासह सर्व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अशोक शिंदे म्हणाले की; ज्या दिवशी मी मुधोजी महाविद्यालयात कार्यरत झालो. त्याच दिवशी पुणे विद्यापीठातील ही दिंडी फलटणमध्ये आली होती व त्यावेळी मला प्रथम माहिती झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीला मोठी परंपरा आहे. “अपत्य स्थाने प्रजाजन:” हे ब्रीद वाक्य धरून फलटणचे राजघराण्याचे पूर्वीपासून कार्यरत होते व आताच्या काळात सुद्धा कार्यरत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बालपणी जे आजोळाचे संस्कार झाले होते. त्यामुळे त्यांना पुढे लढताना नेहमीच उपयोग झाला होता. देशामधील सर्वात पहिले फलटण संस्थान हे तिजोरीतील आहे ह्या रकमेसह भारतात विलीन केले आहे.
यावेळी फलटण नगरीचा व नाईक निंबाळकर राजघराण्याचा इतिहास डॉ. अशोक शिंदे यांनी सांगितला.
यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात आला.