निरगुडीतील संरक्षण भिंतीची उंची वाढवण्याची मागणी; पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे निवेदन


स्थैर्य, फलटण, दि. २८ फेब्रुवारी : निरगुडी गावातील होलार व बौद्ध वस्ती शेजारी मंजूर झालेल्या संरक्षण भिंतीचे काम सध्या सुरू असून, काही दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या मंजूर असलेली भिंतीची उंची ३ मीटर इतकी असून ती परिसरातील परिस्थिती पाहता अपुरी असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात या भागात पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे सध्याच्या उंचीची भिंत उभारल्यास पावसाळ्यात दलित वस्तीमध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आठ ते दहा घरे पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून महिला, पुरुष, लहान मुले तसेच जनावरांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

२०२६ च्या पावसाळ्यापूर्वी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी संरक्षण भिंतीची उंची किमान २ मीटरने वाढवून एकूण ५ मीटर करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, देवराज गोरे, अजित गोरे, आदेश गोरे व लहु गोरे यांनी उपअभियंता, सातारा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग फलटण, प्रांताधिकारी, तहसील कार्यालय तसेच पंचायत समिती फलटण येथे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात पाण्याची संभाव्य पातळी लक्षात घेऊन तातडीने पाहणी करून भिंतीची उंची वाढविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या मागणीसाठी लवकरच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे महेंद्र गोरे यांनी सांगितले.

दरम्यान, पावसाळा तोंडावर असताना प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निरगुडी गावातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!