दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आणि निर्भया पथक, फलटण शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महिला सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास निर्भया पथक, फलटण शहर पोलीस स्टेशन विभागाचे राणी कुदळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल, श्री. दत्तात्रय भिसे, पोलीस कॉन्स्टेबल आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण उपस्थित होते.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे यांनी केले. सदरील कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना श्रीमती वैभवी भोसले, वरीष्ठ महिला कॉन्स्टेबल यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक ही काळाची गरज, निर्भया पथकाकडून काम कसं केलं जातं, क्यूआर कोड बेस पोलिसिंगचा प्लॅन, निर्भया पथकास संपर्क साधण्यासाठी महिलांनी १०३, १०० किंवा १०९१ या टोल फ्री क्रमाकांचा वापर, निर्भया तक्रार पेटीची संकल्पना अशा विविध विषयांवर उपस्थितांना सविस्तर संबोधन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाच्या उपाययोजना व एकंदरीत महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, पण घडल्याच तर त्यातून बाहेर पडण्यासाठी व स्वत:चा बचाव करण्यासाठी निर्भया पथकासारख्या यंत्रणेची मदत घ्यावी, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, प्राध्यापक वृंद उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले, स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी जाधव व आभार कुमारी श्रावणी भोसले हिने केले.