दैनिक स्थैर्य | दि. १६ जुलै २०२४ | फलटण |
निरगुडी (ता. फलटण) गावातील जि. प. शाळेच्या आवारातून जाणार्या कायम रहदारीच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी गतिरोधक बसवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांनी केली आहे.
निरगुडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या आवारातूनच अंतर्गत रस्ता जातो. या रस्त्यावर कायम रहदारी असते. दोन चाकी, चार चाकी वाहने सतत ये-जा करीत असतात. काही दुचाकीस्वार, चारचाकीस्वार भरधाव वेगाने गाडी चालवतात; परंतु हा रस्ता शाळेच्या आवारातूनच असल्याने मुले येथे खेळत असतात, वावरत असतात. परिणामी आतापर्यंत या आवारातील रस्त्यावर १५ ते २० विद्यार्थ्यांचे अपघात झालेले आहेत. यामध्ये त्यांना गंभीर व किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेकदा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावचे नागरिक यांनी ग्रामपंचायत निरगुडीकडे शाळेच्या आवारातील रस्त्यावर वाहनांची गती कमी करण्यासाठी दोन्ही बाजूला तीन टप्प्यांचे गतिरोधक बसवावा, अशी वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून पोकळ आश्वासनांशिवाय नागरिकांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे आपल्या शाळेतील मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालक चिंतेत आहेत.
या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेता लवकरात लवकर मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या आवारातील रस्त्यावर दोन्ही बाजूला तीन टप्प्यांचे गतिरोधक बसवावेत आणि विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोरे यांनी ग्रामपंचायतीकडे पुन्हा एकदा केली आहे.