
सातारा – निरा व्हॅली इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईट लोकार्पणप्रसंगी संतोष पाटील, डॉ. योगेश खरमाटे, हरीष पाटणे, दत्तात्रय ढमाळ, भास्कर पोमण व इतर.
स्थैर्य, 17 फेब्रुवारी, सातारा : दि. नीरा व्हॅली इंडस्ट्रीयल असोसिएशन या संस्थेच्या वेबसाइटचे लोकार्पण जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते झाले.
या वेळी संस्थेचे वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अध्यक्ष दत्तात्रय ढमाळ, उपाध्यक्ष भास्कर पोमण, सचिव तन्वीर लखमसी, सहसचिव राजीव नायडू, खजिनदार पुष्पेंद्र सिंग तसेच सचिन काटकर, मयुर निकम, प्रताप पाटील हे उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा, वाई तालुक्यांमध्ये औद्योगिकरण वेगाने वाढत आहे. खंडाळा, लोणंद, शिरवळ या तिन्ही ठिकाणी एमआयडिसीच्या नियोजित जागेवर व इतर गावातील खाजगी जागेवर उद्योग उभे राहत आहेत. नव्याने उद्योग स्थापन करु पाहणार्यांना लागणार्या आवश्यक परवानग्या व धोरणे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हे असोसिएशन मदत करेल. याचा लाभ नव उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते निरा व्हॅली इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईट www.nvia.inचे लोकार्पण करण्यात आले. ही वेबसाईट ही सदस्य उद्योग, शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, सदस्यत्व प्रक्रिया व NVIA च्या विविध उपक्रमांची माहिती देणारा डिजिटल मंच म्हणून विकसित करण्यात आलेली आहे. या पोर्टलमुळे सदस्य उद्योग, संघटना आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील संवाद अधिक सुलभ होवून नीरा व्हॅलीचा औद्योगिक विकास अधिक गतीमान होईल.
नीरा व्हॅली इंडस्ट्रियल असोसिएशन ही नीरा व्हॅली औद्योगिक पट्टयातील उत्पादक व उद्योगांचे प्रतिनिधित्व करणारी असून ही संस्था औद्योगिक प्रगती, नियमपालन सल्ला, व्यवसाय विकास, पायाभूत सुविधा प्रश्न, तसेच धोरणात्मक पातळीवरील पाठपुरावा या माध्यमातून उद्योगांना सर्वांगीण सहाय्य करते असे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. ढमाळ यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नीरा व्हॅली औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा, शासकीय परवानग्या व गुंतवणूक प्रोत्साहनाशी संबंधित मुद्दयांवर उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला
