
स्थैर्य, फलटण, दि. 15 ऑगस्ट : बारामती शहरातून जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्याच्या धर्तीवर, फलटण शहरातून जाणाऱ्या नीरा उजव्या कालव्याचेही आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणा आमदार सचिन पाटील यांनी केली. या प्रकल्पाच्या नियोजनासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती येथील कालव्याची पाहणी केली.
या योजनेअंतर्गत जिंती नाका ते रावरामोशी पुलापर्यंतच्या कालव्याच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण, अस्तरीकरण, पेविंग ब्लॉक, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी पार्क, ओपन जिम, ज्येष्ठांसाठी बाकडे आणि आकर्षक पथदिवे बसवण्यात येणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे.
“ज्या जनतेने मला निवडून दिले आहे, त्यांच्या अपेक्षा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार,” असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, धोम-बलकवडी व नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता बोडके, गपाट आणि कोकरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे, सिराज शेख, संतोष गावडे, अमोल सस्ते आणि रणजितसिंह भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.