फलटण मॅरेथॉनची नववी आवृत्ती १२ ऑक्टोबरला; ‘अवयवदाना’चा देणार संदेश

यंदा प्रथमच २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनचे आयोजन; डॉ. प्रसाद जोशी यांची माहिती


स्थैर्य, फलटण, दि. 18 ऑगस्ट : फलटणकरांच्या आरोग्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि दरवर्षी आतुरतेने वाट पाहिली जाणारी ‘फलटण मॅरेथॉन’ यावर्षी रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ‘अवयवदानाला प्रोत्साहन’ (Support Organ Donation) ही या नवव्या आवृत्तीची संकल्पना असून, यंदा प्रथमच २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जोशी हॉस्पिटलचे संस्थापक आणि प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी दिली.

यंदाच्या मॅरेथॉनसाठी पहिल्या महिला पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर आणि अवयव प्रत्यारोपणामध्ये महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या झेडसीसी संस्थेच्या गोखले मॅडम या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेमध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर धावण्याच्या शर्यतींचा समावेश असून, प्रत्येक गटात वयोगटानुसार तीन उपगट (१८-३०, ३१-४५, ४६-६४) ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय, १२ ते १८ वयोगटातील मुला-मुलींसाठी ३ किलोमीटरची ‘हसत खेळत बालगट’ फन रन आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठी ३ किलोमीटरची वॉकेथॉन आयोजित केली आहे. विशेष म्हणजे, रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठीही एका विशेष वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा सजाई गार्डन येथून सकाळी ५:३० वाजता सुरू होईल. प्रत्येक धावपटूला टी-शर्ट, टोपी आणि एनर्जी बार असलेले किट मिळणार असून, शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला जोशी हॉस्पिटलतर्फे ‘फिनिशर मेडल’ दिले जाणार आहे. नोंदणीसाठी www.joshihospitalpvtltd.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!