दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभागी झालेले बक्षीस पात्र सत्तर मल्ल तसेच महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी विजेत्या सर्वांना तब्बल नऊ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा तालीम संघाचे प्रमुख मार्गदर्शक साहेबराव पवार यांनी त्यांच्या वैयक्तिक मिळकती मधून तब्बल नऊ लाख रुपयांचे बक्षीस या मल्लांना देण्याचे जाहीर केले पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाची माहिती पत्रकारांना दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार सुधीर पवार तसेच तालीम संघाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
साहेबराव पवार पुढे म्हणाले, जिल्हा तालीम संघाने सर्व संचालक तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या सहकार्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले. सर्व संचालकांनी रात्रीचा दिवस करून सर्व संयोजन उत्तम रित्या पार पाडले. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेने ठरवून दिलेल्या संकेतानुसार आणि नियमास आधीन राहून या स्पर्धांचे संयोजन तब्बल 63 वर्षानंतर पुन्हा एकदा करताना जिल्हा तालीम संघ आणि त्यांच्या सदस्यांनी नेटकेपणाने या स्पर्धा पार पाडत साताऱ्याचा नावलौकिक राखला. मात्र संयोजनाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र केसरी विजेता मल्लाने प्रसारमाध्यमांसमोर बक्षीस बक्षिसाची रक्कम न मिळाल्याची खंत व्यक्त केली. त्याची सल कुठे तरी मनामध्ये होती. त्यामुळेच माझ्या वैयक्तिक मिळकतीमधून तब्बल नऊ लाख रुपयांची बक्षिसे देण्याचा निर्णय मी घेतला आणि सर्व संचालक यांच्या उपस्थितीत हा निर्णय पत्रकारांसमोर मी जाहीर करत आहे.
यामध्ये महाराष्ट्र केसरी विजेते मल्ल पृथ्वीराज पाटील याला एक लाख वीस हजार रुपये तर उपमहाराष्ट्र केसरी मल्ल याला 70 हजार रुपये याशिवाय माती आणि गादी गटातील विजेत्या प्रत्येकी पहिल्या तीन क्रमांकानुसार सुमारे 70 मल्लांनी बक्षीस पात्र कामगिरी नोंदवली. सुवर्णपदक विजेत्या मल्लाला 20000, रोप्य पदक विजेत्या मल्लाला 10000 आणि कास्य पदक विजेत्या मल्लाला पाच हजार अशी बक्षिसे जिल्हा तालीम संघाच्या वतीने देण्यात येणार आहेत. या रकमांचे धनादेश तयार करण्यात आले असून त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांना संपर्क साधून हे धनादेश त्यांच्याकडे रवाना करण्यात येणार असून त्यांच्यामार्फत ही रक्कम त्या खेळाडूंना पोहोच केली जाणार असल्याचे दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या बक्षिसाची रक्कम यापूर्वी कोणत्याही संयोजकांनी दिली नव्हती. महाराष्ट्राच्या तसेच साताराच्या क्रीडा परंपरेला गालबोट लागण्याच्या उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. उगाच कष्टाने केलेल्या सर्व कामांना कोणतेही बालंट नको तसेच जे कष्ट प्रामाणिक पणे झाले त्या कष्टांची ही किंमत झाली पाहिजे. मल्लांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी नोंदवली त्यामुळेच त्यांचे कौतुक क्रमप्राप्त ठरते म्हणूनच नऊ लाख रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात येणार असल्याचे दीपक पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या दरम्यान झालेल्या खर्चाचे ऑडिट व्हावे अशी चर्चा सातत्याने होत होती या अनुषंगाने दीपक पवार यांना छेडले असता ते म्हणाले जिल्हा तालीम संघाच्या संचालकांनी लोकवर्गणी काढून हा सर्व खर्च केला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून प्रशासनाने प्रशासकीय मदत वगळता एक रुपया सुद्धा खर्च केलेला नाही लाल माती पासून ते मेपर्यंत आणि इतर सुविधांचा सर्व खर्च हा जिल्हा तालीम संघाने त्यांच्या वर्गणीतून केला आहे जर कोणी यावर शंका घेऊन जर वेगळा प्रचार करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू असा सज्जड इशारा त्यांनी दिला जिल्हा तालीम संघ हा कुस्तीच्या प्रसारासाठी प्रेरित आहे जाधव आणि नाईक यांच्यामध्ये जो वाद रंगला जात आहे तो अनाठायी आहे अमर दादा जाधव जिल्हा तालीम संघाचे चेअरमन असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार तालीम संघाची वाटचाल सुरू आहे आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत जे आमच्या मतभेदांविषयी बोलतात ते जिल्हा तालीम संघाचे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांना आमच्या तालीम संघाच्या कार्यात करणीवर बोलण्याचा यत्किंचितही अधिकार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले ज्यांना आमच्या खर्चावर शंका आहे त्यांना खर्चाचा सर्व हिशोब सादर करण्याची आमची तयारी असल्याचेही सुधीर पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.