सहा गुन्ह्यातील नऊ लाखाचा मुद्देमाल शहर पोलिसांकडून फिर्यादीना परत – अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । सातारा । सातारा शहर पोलिसांनी लुटमार झालेल्या 6 वेगवेगळ्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून तब्बल नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरित्या हस्तगत केला आणि तो मुद्देमाल संबंधित फिर्यादी यांना परत देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक आचल दलाल व शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर उपस्थित होते.

बोऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी घरफोडी जबरी चोरी अशा विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये खिंडवाडी प्रतापसिंह नगर जय मल्हार सोसायटी खेड, शाहूनगर, कृष्णा नगर व मुंबईवरून साताऱ्यात आलेल्या एका महिलेचे दागिने लुबाडण्यात आले होते. या सर्व गुन्ह्यांचा पोलिसांनी सखोल तपास केला. या तपासामध्ये सात लाख रुपयांचे दागिने व एक लाख 80 हजार रुपये रोख असा आठ लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस तपासाच्या प्रक्रियेत बऱ्याच वेळा कायदेशीर बाबींमध्येच मुद्देमाल अडकून पडतो आणि फिर्यादीना तो मिळताना बऱ्याच प्रक्रियांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सदर 6 प्रकरणांमध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन गुन्ह्याची उकल तर केलीच शिवाय कोर्टाच्या परवानगीने तो मुद्देमाल संबंधित फिर्यादी ना कसा मिळेल याची विशेष परवानगी सुद्धा मिळवली. यावेळी या प्रकरणाचा वेगवेगळ्या प्रकरणातील फिर्यादी शिवाजी चव्हाण, शोभा राजाराम कदम, हर्षा हरी नाईक, अनिता वाघ, इंदू काळे व अश्विनी अरविंद उदगीर हे उपस्थित होते. या सर्व फिर्यादीना त्यांचा मुद्देमाल आँचल दलाल यांच्या हस्ते पुन्हा माघारी देण्यात आला.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहर पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कामांचा आढावा बोराडे यांनी घेतला शहर पोलिसांनी 74 बेवारस गाड्यांचा लिलाव करून अडीच लाख रुपयांचा महसूल शासनाकडे जमा केला. रस्त्यावर केक कापणाऱ्या 16 लोकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोन युवकांना शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 15 लाख रुपयांची वसुली केली. वाय. सी. कॉलेज सातारा येथे दहशत पसरवणार्‍या अकरा जणांना अटक करण्यात आली. वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी पर्दाफाश करून पाच कोटी रुपयांची 34 वाहने जप्त केली. तसेच पोवईनाका येथे दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या तीन आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आचल दलाल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी विशेष अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!