
दैनिक स्थैर्य । 9 एप्रिल 2025। सातारा । चिमणगाव, ता. कोेरेगांव येथे मंगळवारी दुपारी महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लमाण वस्तीमध्ये आग लागली. वस्तीतील नऊ कुटुंबियांची घरे जळून खाक झाली. त्याचबरोबर पाच शेतकर्यांची लाखो रुपयांची वैरण जळाली. ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर आणि जरंडेश्वर शुगर मिलच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
चिमणगाव येथे उमेश बोधू राठोड हे विजापूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असून गेल्या 25 वर्षांपासून ते चिमणगाव येथे मोलमजुरीचे काम करत आहेत. त्यांनी आपल्या राज्यातून नऊ कुटुंब शेती व अन्य कामासाठी चिमणगाव येथे आणले आहेत. हे सर्वजण एकाच ठिकाणी घरे बांधून राहिलेली आहेत. 16 झोपड्यांमध्ये 40 ते 50 लोक वास्तव्य करत आहेत. मंगळवारी सकाळी गावातील शेतकर्यांच्या शेतातील ज्वारी काढण्यासाठी लमाण वस्तीतील सर्व लोक घरे बंद करून गेले होते. दुपारी एकच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले, त्यातून या वस्तीला आग लागली आणि सर्व घरे जळून खाक झाली. घराजवळ उभ्या असलेल्या मोटरसायकली जळून खाक झाल्या.
या वस्ती परिसरात शेतकरी दत्तात्रय अंकुश भगत, अक्षय महादेव जाधव, अमित अशोक भगत, रमेश एकनाथ भगत, संजय तुकाराम भगत यांची वैरणीची गंज होती. त्यामध्ये साडेतीन हजार वैरणीच्या पेंड्या होत्या. आजच्या तारखेत त्या सापडल्याने त्या देखील जळून खाक झाल्या. लमाण वस्तीतील सर्व कुटुंबीयांची घरे पूर्णपणे जळाली, त्यात सुमारे वीस लाख रुपयांचे त्याचबरोबर पाच शेतकर्यांचे पंधरा लाख रुपयांचे असे एकूण 35 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थ आणि पोलीस पाटील यांनी तातडीने आग लागल्याची माहिती ग्रामपंचायत आणि जरंडेश्वर शुगर मिल येथे दिली. ग्रामपंचायतीने पाण्याचा टँकर पाठवून दिला. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी पाण्याच्या बंबाच्या आग आटोक्यात आणली.