कराड शहरातील नउ हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. 25 : कराड शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कराड तालुक्यात प्रशासनाने विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. त्यानुसारच कोरोना संशयित रुग्णांसह बाधितांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कराड शहरातील नऊ हॉस्पिटल कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. शासनाकडून या संबंधीत हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह अन्य स्टाफलाही दोन प्रशिक्षणे दिली असून गरज भासल्यास त्या हॉस्पिलटलांची सर्व यंत्रणा कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे.

कराड तालुक्यात कोरोनाची लक्षणे दिसणार्‍या नागरिकांच्या तपासण्याची सुविधा कृष्णा हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आहे. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर आणि बेडची सोय आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणार्‍या रुग्णांनी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये न जाता थेट या दोन्ही  हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णांच्या तपासणी कृष्णा हॉस्पिटल व सह्याद्री हॉस्पिटलमध्ये होत आहे. त्याचबरोबर सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, श्री हॉस्पिटल, एरम हॉस्पिटल, सिद्धिविनायक हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल यांसह अन्य दोन हॉस्पिटलांना कोविडच्या उपचारासंबंधी पत्र दिली आहेत. भविष्यात गरज भासल्यास या रुग्णालयांचे कोविड हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अत्यावश्यक रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन कराड शाखेने पुढाकार घेतला आहे. याबाबत माहिती देताना इंडियन मेडिकल असोसिएशन कराड शाखेचे अध्यक्ष डॉ.वैभव चव्हाण म्हणाले, संभाव्य कोविड हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय शहरातील अन्य हॉस्पिटलही अत्यावश्यक रुग्णांसाठी खुली आहेत. नियमित तपासणीसाठी रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवेची हॉस्पिटल तयार ठेवली आहेत. गरज भासल्यास त्यांच्या सेवेसाठी शहरातील अन्य हॉस्पिटल्स व तज्ज्ञ डॉक्टर आहेत. शहरात सध्या कोरोनाची साथ आटोक्यात आहे, तरीही संभाव्य धोका लक्षात घेऊन नऊ रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलचा दर्जा देण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी पीपीई किटसह अद्ययावत सेवा पुरविल्या गेल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!