स्थैर्य, पाटणा, दि.१३: बिहार विधानसभा
निवडणूक हळुहळू रंगू लागली आहे. ऑनलाईन प्रचार सुरू झाला असून, जवळपास
सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपानंही
उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत. उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात
आल्यानंतर बंडखोरी उफाळून आली आहे. नऊ नेत्यांनी ‘एनडीए’च्या
उमेदवारांविरोधातच दंड थोपटल्याने भाजपाने नऊ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा
करण्यात आली आहे. भाजपासोबत जदयू आणि इतर दोन छोटे पक्ष एनडीएतून निवडणूक
लढवत आहेत. मात्र, एनडीएतील जागावाटपात अनेक जागा जदयू व मित्रपक्षांकडे
गेल्याने भाजपातील इच्छुक नेते नाराज झाले आहेत.
नाराज झालेल्या नेत्यांनी बंडखोरी केली असून, एनडीए उमेदवारांविरोधात
उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत भाजपाने
नऊ बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. नऊ नेत्यांना सहा वर्षांसाठी
पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यात राजेंद्र सिंग, रामेश्वर चौरसिया,
उषा विद्यार्थी, रवींद्र यादव, श्वेता सिंग, इंदू कश्यप, अनिल कुमार, मृणाल
शेखर, अजय प्रताप या बंडखोर नेत्यांचा समावेश आहे.
हे एनडीए उमेदवारांच्याविरोधात निवडणूक लढवत असून, यामुळे एनडीएसोबतच
पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. हे पक्षाच्या शिस्तीविरूद्ध आहे. या
कामामुळे या नेत्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे,
असे भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष संजय जायसवाल यांनी म्हटले आहे.
भाजपाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी पक्षातील
नेत्यांना इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही उमेदवारी दाखल केल्यानंतर ही
कारवाई करण्यात आली आहे. ‘एनडीएच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवू नये,
अन्यथा त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल,’ असा इशारा मोदी यांनी दिला
होता.