स्थैर्य, खंडाळा, दि.०८: खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात दारुची पार्टी करत झिंगाट झालेल्या बारामती व खंडाळा तालुक्यातील धनदांडक्यांनी शासनाची परवान्याची मुदत संपलेल्या रिव्हाँल्व्हरमधून हवेत दोनवेळा फायरिंग करीत दहशत निर्माण केली. याप्रकरणी नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
किरण देविदास निगडे (वय 46 रा.गुळूंचे, ता. पुरंदर जि.पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळूंखे (वय 28, रा. कानिफनाथवस्ती, भादे, ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय 34 रा. चोपडज, पोस्ट करंजे, ता. बारामती जि. पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32, रा. वाकी पोस्ट करंजे ता. बारामती जि. पुणे), तात्याराम अर्जून बनसोडे (वय 38, रा. अंथुर्णे ता. इंदापूर, जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळूंखे (वय 39, रा. चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता.बारामती जि.पुणे), योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा.राख ता.पुरंदर जि.पुणे), वसंत नामदेव पवार (वय 47,रा.कोळविहीरे ता.पुरंदर जि.पुणे),अरविंद घनशाम बोदेले (वय 41,सध्या रा.लवथळेश्वर, जेजूरी, ता. पुरंदर जि. पुणे मूळ रा. भिवापूर, जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हॉल्व्हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. किरण निगडे यानेः दहशत पसरवण्याच्या उद्देशाने रिव्हाँल्व्हरद्वारे हवेत गोळीबार करत बेकायदेशीररित्या मित्र योगेश रणवरे याला रिव्हाँल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार केला. वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणार्यांना मुसक्या आवळत पोलीसी खाक्या दाखवला.
याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय शस्त्र अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे करत आहे.