दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सांगली । सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे जिल्हा परिषद शाळेमध्ये सन १९८६-८७ ची इयत्ता ७ वी च्या पहिल्या बॅच मधील माजी विद्यार्थी यांनी र्मॉडेल स्कूल अंतर्गत जि. प. शाळा निंबवडे शाळेस शालोपयोगी ४५०००/- हजार रुपये किमतीचे क्रीडा साहित्य भेट दिले आणि या शाळेमधून जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावेत अशी आशा व्यक्त केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक मोटे गुरुजी यांनी दिली.
सदर शाळेस मॉडेल स्कूल अंतर्गत एक कोटी रुपये पर्यंत चा निधी शाळा दुरुस्ती, मैदान निर्मिती, हँड वॉश स्टेशन , सुसज्ज प्रसाधनगृहे इ. शाळा विकासाच्या कामासाठी मिळणार असून लायब्ररी, क्रीडा साहित्य, कॉम्पुटर लँब इ. गोष्टी लोक सहभागातून उभ्या करायच्या आहेत. यापूर्वी इयत्ता ७ वीच्या या बॅचने गावामध्ये इतर कामे केली असल्याने या कामाकरिता श्री मोटे गुरुजी यांनी माजी विद्यार्थी श्री नामदेव मोटे आणि श्री अजितकुमार चांगण यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर्ग मित्रांशी संपर्क केला. आर्थिक मदत तातडीने उभी करीत मुंबईतील प्रख्यात दुकानामधून क्रीडा साहित्य खरेदी करून शाळेत पाठवले त्याचा शालार्पण कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कामी मुंबई पुणे येथे नोकरी व्यवसाय करणारे डॉ. नाथासाहेब मेटकरी ,श्री.अजितकुमार चांगण , डॉ. तुकाराम मोटे, श्री नामदेव मोटे, श्री आकाराम पाटील , श्री मनोहर देवडकर ( शेतकरी ) श्री संजय गवळी श्री राजाराम देवडकर यांनी आर्थिक मदत केली. असाच आदर्श घेऊन जर सर्वांनी आपण ज्या शाळेत मोफत शिकलो त्या शाळेचे ऋण फेडायचा प्रयत्न केला तर महारष्ट्रातील सर्व शाळा मॉडेल स्कूल झाल्याशिवाय रहाणार नाहीत असे मत आदर्शशिक्षक श्री डी आर कुलकर्णी सर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सर्व शिक्षक , पालक प्रतिनिधी गावातील प्रतिष्ठीत नागरीक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचे उपमुख्याध्यापक श्री मारुती देवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.