काळा म्हणल्याच्या कारणांमुळे निंबळक ता. फलटणमध्ये दोन कुटुंबांत वाद; ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण, दि.१: काळा म्हटल्याच्या कारणावरुन निंबळक ता. फलटण येथे दोन कुटूंबात झालेल्या वादात सतरा जणांविरोधात परस्परविरोधी तक्रारी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत राहूल आप्पा तथा विठ्ठल कुंभार वय ३६ रा. निंबळक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी निंबळक ता. फलटण येथे रात्री नऊच्या सुमारास ते पोपट श्रीरंग कुंभार यांच्या घरासमोरुन लघुशंकेस जात होते. त्यावेळी माधुरी कुंभार यांनी त्यांना काळा म्हणून हिणवल्याने त्याबाबत त्यांना विचारणा करण्यास गेले तेव्हा, संदिप अशोक कुंभार, पोपट श्रीरंग कुंभार, रोहिणी पोपट कुंभार, माधुरी संदिप कुंभार, तुषार पोपट कुंभार यांनी आम्हाला शिवीगाळ व दमदाटी केली. संदिप कुंभार याने राहूल आप्पा यांच्या आई मंगल यांना भिंतीवर जोराने ढकलून दिल्याने त्यांना डावा खांदा व खुब्यास मुका मार लागला आहे. तसेच त्यांची पत्नी मोनिका यांच्या अंगाला वाईट उद्देशाने हाथ लावला व कपडे फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरुन वरील पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत.

याच प्रकरणी संदिप कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी निंबळक येथे रात्री नऊच्या सुमारास आपले चुलत चुलत भाऊ तुषार कुंभार यांच्या घरासमोर राहूल आप्पासो कुंभार, आप्पासो बाबासो कुंभार, राजेंद्र नानासो कुंभार, गणेश राजेंद्र कुंभार, आदिक आप्पासो कुंभार, संतोष शिवाजी कुंभार, कुमार बाबासो कुंभार, कौशल्या आनंदा कुंभार, मंगल आप्पासो कुंभार, अरुणा राजेंद्र कुंभार, मोनिका राहूल कुंभार, आनंदा श्रीरंग कुंभार सर्व रा. निंबळक यांनी येवून मला राहूल कुंभार याने तुम्ही काळा कोणाला म्हणता असे म्हणत गैरसमज करुन घेत जमाव जमवत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राहुल व आदिक कुंभार याने मला दगडाने व काठीने मारहाण केली. या मारहाणीत आपल्या डोक्यात, उजव्या हाताला व छातीवर मार लागला आहे. तसेच वडिल अशोक कुंभार यांना विटेने डोक्यात पाठीमागे मारुन गंभीर जखमी केले. यावरुन वरील बारा जणांविरोधात फिर्याद दाखल झाली असून तपास पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!