
दैनिक स्थैर्य । दि. २० डिसेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यामध्ये दर वर्षी सुमारे 3 हजार क्षयरुग्ण आणि जोखमीचे टीबीचे सरासरी 150-200 रुग्ण आढळून येतात. शासनामार्फत निदान, औषधोपचार, तपासणी मोफत करण्याबरोबर आर्थिक सहाय्य करण्यात येते. परंतु वेळोवेळी तपासणीसाठी जाणे-येणे, घरामध्ये अन्न धान्य टंचाई यासह सर्व बाबी लक्ष्यात घेऊन निक्षय मित्र संकल्पना योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक संस्था, सहकार सेवा, विविध संघटना, लोक प्रतिनिधी, दानशूर व्यक्ती, व्यापरी यांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार क्षय रुग्णांच्या कीटसाठी दरमहा 600 ते 800 रुपये खर्च येणार आहे. हे कीट रुग्णाचा उपचार सुरु आहे तोपर्यंत म्हणजे 6 ते 8 महिन्यापर्यंत देण्यात येणार आहे. ज्या क्षय रुग्णांना पोषण आहार उपलब्ध करण्याची संमती दिली आहे, अशा रुग्णांना मदत देणे प्रस्तावित आहे. क्षय रुग्णांच्या सर्वांगिण विकासासाठी निक्षय मित्र होऊन मदत करावी, असेही आवाहन श्रीमती बडदे यांनी केले आहे.