दैनिक स्थैर्य | दि. १८ जानेवारी २०२५ | फलटण |
कृष्णामाई मेडिकल अॅण्ड रिसर्च फौंडेशन संचलित निकोप हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉ. जे. टी. पोळ व डॉ. सौ. सुनिता पोळ यांनी गेली ३० वर्षांहून अधिक काळ फलटण शहर व परिसरासह फलटण, माण, खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलेली वैद्यकीय सेवा निश्चित अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार आ. सचिन पाटील यांनी व्यक्त केले आहेत.
आ. सचिन पाटील यांनी नुकतीच निकोप हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी डॉ. जे. टी. पोळ व सहकार्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले.
फलटण येथे सर्व वैद्यकीय साधने, सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अधिक उपचारासाठी रुग्णांना पुणे येथे पाठवावे लागत असे, ते वेळेत उपचार मिळण्यासाठी सोईचे नव्हते आणि खर्चिक असल्याने सर्वसामान्यांची कुचंबणा होत असे, ती ओळखून डॉ. जे. टी. पोळ यांनी पुण्यामुंबई ऐवजी फलटण येथे सुसज्ज हॉस्पिटल उभारुन सर्वसामान्यांना पुण्यामुंबई प्रमाणे दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्याचे आ. सचिन पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून देत डॉ. जे. टी. पोळ यांना धन्यवाद दिले.
आज निकोप हॉस्पिटलमध्ये उत्तम आय.सी.यू., कॅथलॅब आणि सर्व प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय साधने तसेच विविध विमा कंपन्या आणि शासकीय योजनांद्वारे रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध असून डॉ. जे. टी. पोळ यांच्यासह त्यांचे सहकारी डॉक्टर्स दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी सतत सज्ज असल्याने रुग्ण व नातेवाईक समाधानी असल्याचे आ. सचिन पाटील यांनी यावेळी सांगितले.
डॉ. जे. टी. पोळ, डॉ. सौ. सुनिता पोळ व सहकारी दररोज दर्जेदार वैद्यकीय सेवा देत असतात आणि त्यांच्या दोन्ही मुली – जावई आणि अन्य तज्ज्ञ डॉक्टर्स पुण्यातून दर आठवड्याला येथे येऊन रुग्णांना वैद्यकीय सेवा देत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाल्याचे सांगत आ. सचिन पाटील यांनी समाधान व्यक्त करीत डॉ. पोळ व कुटुंबीयांचे अभिनंदन केले.