
स्थैर्य, फलटण, दि. 9 नोव्हेंबर : बिरदेवनगर, (जाधववाडी) ता. फलटण येथील निखील चंद्रकांत भोसले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेमधून सहाय्यक राज्यकर आयुक्त वर्ग- 1 (राज्यपत्रीत अधिकारी) या पदी नियुक्ती झाली आहे. निखील भोसले सध्या जळगाव जामोदनगर, जि. बुलढाणा येथील नगरपालिकेत कर निर्धारण अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
निखील भोसले यांचे प्राथमिक शिक्षण निर्मलादेवी विद्या मंदिर विद्या नगर फलटण येथे माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण तर उच्च माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे व कृषी पदवीचे शिक्षण कृषी महाविद्यालय पुणे येथे झाले. निखील भोसले यांचे वडील चंद्रकांत भोसले हे दहिवडी येथे उप कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. निखिल भोसले हे सेवानिवृत्त दुध संकलन अधिकारी प्रभाकर भोसले यांचे पुतणे आहेत. त्यांचे भाऊ अभिजीत भोसले हे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथे कार्यरत आहे. त्यांची बहिण मंजुषा भोसले, मोटार वाहन निरीक्षक म्हणून नांदेड येथे कार्यरत आहेत. आई वडिलांचे आशिर्वाद तसेच अधिकारी होण्याची जिद्द, चिकाटी, महत्वकांशा यामुळे यश मिळाल्याचे निखील भोसले यांनी सांगितले.

