
स्थैर्य, फलटण, दि. 12 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ (ओबीसी पुरुष) मधून निलेश अशोक गायकवाड यांचे नाव एक आश्वासक चेहरा म्हणून चर्चेत आले आहे. कष्टाळू, मेहनती आणि राजे घराण्याशी प्रामाणिक असलेले नेतृत्व म्हणून गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी प्रभागातील सर्वसामान्य जनतेने पहिली पसंती दर्शवली आहे.
प्रभाग क्रमांक ८ हा ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागात तरुण, होतकरू, मितभाषी आणि ‘सर्वसामान्य लोकांना आपला माणूस’ अशी ख्याती असलेले उमेदवार म्हणून निलेश गायकवाड यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यांच्या पाठीशी युवकांची मोठी फौज उभी असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसत आहे.
निलेश गायकवाड यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक प्राधान्य दिले आहे. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आणि सामाजिक कार्यातून त्यांनी युवकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि सर्वांच्या सुख-दुःखात एक पाऊल पुढे राहण्याच्या स्वभावामुळे ते प्रभागात लोकप्रिय आहेत.
गायकवाड यांनाच राजे गटाने उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी आता प्रभागातील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निलेश गायकवाड यांच्या नावाचा उमेदवारीसाठी गांभीर्याने विचार करावा, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
निलेश गायकवाड यांना पक्षातील नेत्यांचीसुद्धा पसंती मिळाल्याची चर्चा प्रभागात सुरू आहे. त्यामुळे ‘आपल्या हक्काचा माणूस हाच आपला उमेदवार’ असे चित्र प्रभाग क्रमांक ८ मध्ये निर्माण झाले आहे. त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

