दैनिक स्थैर्य । दि. १० जुलै २०२१ । मुंबई । साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती कडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याची टीका मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या समितीची अनेक महिने उलटून गेले तरी बैठक झाली नाही. तसेच नियुक्त सदस्यांना ओळखपत्र देण्याचे काम सुद्धा शिक्षण विभागाने केलेले नाही.
फडणवीस सरकारच्या काळात त्यावेळचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साठे यांचे साहित्य प्रकाशित करून ते शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले होते.
त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीचे सरकारने ही समिती बरखास्त करून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षते खाली जम्बो समिती स्थापन करण्यात आली. मात्र या समितीच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकाशन समितीची बैठक घेण्यास राज्य सरकार नकारात्मक भूमिकेत असल्याची टीका श्री. गोरखे यांनी केली आहे..