दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । सातारा । जगभरातील पर्यटकांना भुरळ घातलेल्या जागतिक वारसा स्थळ कास पठारावर पावसाळ्यानंतर विविध रंगीबेरंगी फुलांचे गालिचे तयार होतात. ही हंगाम फुले पाहण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक याठीकाणी भेट देतात. हे पर्यटन हंगामापुरते मर्यादित न राहता, ते पठार व परिसरात फिरायला यावेत व त्यातून स्थानिकांना रोजगार निर्मिती व्हावी, या हेतूने नाईट जंगल सफारी सुरू करण्यात येणार आहे. सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या संकल्पनेतून सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समिती यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
कास पठार व परिसरातील पर्यटन हे हंगामी न राहता, ते बारमाही रहावे आणि पर्यटन वाढीस लागावे, या हेतूने मंगळवारपासून (दि.१९) नाईट जंगल सफारीचा हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ताडोबा अभयारण्याच्या धर्तीवर कास पठार व परिसरातील ५० किमी अंतरावर नाईट जंगल सफारी करण्याचे कास पठार कार्यकारी समिती व सातारा वनविभाग यांनी निश्चित केले आहे.
या नव्याने सुरू केलेल्या उपक्रमासाठी समितीकडून दोन सुसज्ज गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. याचा मार्ग कास पुष्प पठार – घाटाई फाटा – घाटाई देवी मंदिर – वांजुळवाडी – कास तलाव – कास मंदिराच्या पुढील बाजूने तांबी फाटा -पाली, तांबी – धावली – जुंगटी – कात्रेवाडी – परत तांबी फाटा – अंधारी – कोळघर – सह्याद्रीनगर – चिकनवाडी – मोळेश्वर – एकीव – पारंबे फाटा परत कास पुष्प पठार असा ५० किमीचा हा मार्ग आहे. यामध्ये एकूण ३ तासाची जंगल सफरी असणार आहे.