स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 11 : केंद्र सरकारच्या “स्किल इंडिया” उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड-एनएफएल या केंद्रीय खते विभागाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाने आपल्या कारखान्याजवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांशी (आयटीआय) सहयोग करायला सुरवात केली आहे, जेणेकरून युवकांना विविध व्यापार क्षेत्रात प्रशिक्षित करून अवजड आणि प्रक्रिया उद्योगात त्यांच्या रोजगाराच्या संधीत वाढ होईल.
पंजाबमधील कंपनीच्या नांगल प्रकल्पाने तरुणांना 12 प्रकारच्या व्यापारात प्रशिक्षण देण्यासाठी आयटीआय, नांगल यांच्याबरोबर सामंजस्य करार केला आहे. ड्युअल सिस्टम ऑफ ट्रेनिंग योजने अंतर्गत या विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल ज्या अंतर्गत ते संस्थेत सैद्धांतिक कौशल्ये आणि एनएफएल नंगल प्रकल्पात प्रत्यक्ष नोकरीचे प्रशिक्षण शिकतील.
एनएफएल नांगल प्रकल्पाच्या डीजीएम (एचआर) रेणू आर पी सिंग आणि आयटीआय, नांगलचे प्राचार्य ललित मोहन यांच्यात सामंजस्य कराराचे आदानप्रदान झाले.
आयटीआय, नांगल ही पंजाबमधील सर्वात जुनी संस्था आहे. आयटीआयबरोबर या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, एनएफएल पंजाब राज्यात असा पुढाकार घेणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे.
संस्थांमधून अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन स्किल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी भविष्यात असे आणखी पर्याय शोधण्याची कंपनीची योजना आहे.
एनएफएलचे गॅसवर आधारित पाच अमोनिया-युरिया प्रकल्प आहेत . पंजाबमध्ये नांगल आणि भटिंडा प्रकल्प, हरियाणामध्ये पानिपत आणि मध्य प्रदेशात गुणा जिल्ह्यात विजयपूर येथे दोन प्रकल्प आहेत.